ग. ग. गवाक्ष
:-
सौ. विमल (वसुमती) मानेबाई (माजी सुपरवायझर - ग. ग. हायस्कूल, नाशिक)
पहाटे ५-५॥ ची वेळ होती. आमच्या
शाळेची मुलींची सहल सापुताऱ्यास चालली होती. सहलप्रमुख सौ.
मानेबाई; त्यांच्या मदतीस आम्ही ३ शिक्षिका व १
शिपाई असे मुलींसोबत चाललो होतो. बसमध्ये मुलींच्या भेंड्या, गाणी, गप्पा, मोठ्याने बोलणे
- हसणे अशी मजेत दंगा-मस्ती सुरु होती.
सहलीचा आनंद मुक्तपणे लुटणे चालू होते. आता त्यांच्यावर शाळेतील कोणतीच बंधने नव्हती. इतक्यात ड्रायव्हरने बसला अचानक ब्रेक लावला.
बस थांबली. मुली किंचाळायला लागल्या.
‘काय झाले?’ एकच प्रश्नचिन्ह उभे राहिले. समोरचे दृश्य पाहून, आम्ही
हादरलोच. आमच्या सौ.
मानेबाईंनी “चूप” असे मोठ्याने
म्हटले. मुली एकदम शांत. मानेबाई पर्स घेऊन,
बसमधून रस्त्यावर उतरल्या. आम्ही शिक्षिका व शिपाई खाली उतरलो. भयंकर दृश्य
समोर उभे होते. ७-८
दांडगी-राकट माणसे, काठ्या व कुऱ्हाडींसह
बससमोर उभी होती. रस्ता मोठ्या दगडांनी व काट्यांनी
अडविलेला होता. आमच्या मानेबाई हाताची घडी घालून त्या लोकांसमोर
उभ्या राहिल्या. शांत स्वरांत
न घाबरता त्या लोकांना म्हणाल्या, “बाबांनो, तुम्हाला
काय हवे? आम्ही मुलींना घेऊन सहलीला चाललो आहोत. आमच्या जवळ फक्त जेवणाचे डबे आहेत.”
आमच्या मानेबाईंचा शांत, धीरगंभीर आवाज ऐकून, ते वाटमारी करणारे लोक वरमले. त्यांचा म्होरक्या म्हणाला, “बाई, आम्हाला फक्त १ रुपया द्या. काही न मिळवता रिकाम्या हाताने
परत जाणे, आमच्या धंद्याच्या नियमांत बसत नाही.” सौ. मानेबाईंनी त्यांना एक
रुपया दिला व आमचा मार्ग मोकळा झाला. काही व्यक्ती आपल्या सात्विक
आचार-विचारांतून संकटाला तोंड देतात. त्याचे
उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मानेबाई.
मानेबाई
आमच्या मुख्याध्यापिका सौ. राजदेरकरबाईंचा
उजवा हात. मोठ्याबाईंचे (सौ राजदेरकरबाईंचे)
मुलींवर संस्कार करण्यासाठी विविध प्रयोग चालत. त्यांना साथ होती, मानेबाईंची.
आम्हा शिक्षिकांमध्ये त्या मिळून-मिसळून वावरत असत. आपल्या मृदुवाणीनी
त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या
वाणीत मृदुता तर होतीच पण थोडी जरबही जाणवायची. त्यामुळे त्यांनी
सांगितलेले काम केलेच जायचे. त्यांनी आम्हा शिक्षकांना बोलावले
तर ‘आम्ही पळत त्यांच्यासमोर हजर रहावे’ ही त्यांची अपेक्षा. ‘प्रत्येक व्यक्तीने चपळ राहिले
पाहिजे’, हा त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन.
सावळा
रंग, बोलके डोळे, उंचीला योग्य असा बांधा, टापटिपीने नेसलेली व्यवस्थित साडी व योग्य ब्लाऊज, किंचित
कुरळे केस. केसाचे चक्कर घातलेले व खांद्यावर पर्स अशा थाटात
मानेबाईंचा शाळेत सर्वत्र वावर असे. कारण त्या शाळेच्या सुपरवायझर
होत्या ना ! शाळेतील वातावरण प्रसन्न व शिस्तित राखण्यावर त्यांचा
कटाक्ष होता. शाळेचे व्यवस्थापन
पहात असल्या तरी त्यांना अध्यापनाचे काम करावे लागायचे. त्या जन्मजात शिक्षक असल्यामुळे, आपले काम चोख करीत असत.
शासकीय
नियमाप्रमाणे त्यांची बदली झाल्याने त्यांना आमचा
निरोप घ्यावा लागला. आमच्या शाळेशी असलेला त्यांचा संबंध तुटला; तरी त्यांनी आमच्याशी
जोडलेले जिव्हाळ्याचे संबंध अखंड जपले.
श्रीमती प्रभा आठवले
(माजी शिक्षिका – ग. ग. हायस्कूल, नाशिक)
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.