मागे वळूनि पहाता ------
My
little friends, now I am retired
But
I am not tired.
Remember
this, God is kind
My
little friends, keep it in mind
Be
sincere about your work
In
the life there are some jerks
Happiness
lies, first of all in the health
My
little friends, try to get this wealth
Knowledge
is power
Try
to climb this tower
Be
sure you are right
My
little friends, Be ready to fight.
Wish
me luck, as you wave me good-bye
Without
tears in your eye
Give
me smile, I keep it forever
My
little friends, I’ll forget you
never
पहातां पहातां माझा सेवानिवृत्तीचा दिवस उगवला. ह्या कर्मभूमीचा निरोप घेताना भावेनेला स्पर्श
करुन भाषण न करण्याच्या विचारातून, माझे विचार आपोआप इंग्रजी
कवितेत शब्दबद्ध झाले. निरोपाच्या वेळी माझ्यातली इंग्रजीची शिक्षिका
माझ्या उपयोगास आली. सोप्या भाषेतली स्वरचित कविता मी वाचून दाखवली.
सर्वांना समजली म्हणून खूप आवडली.
खर सांगायचे म्हणजे,
माझा पिंड साहित्त्य-कला प्रान्तात रमणारा.
आमच्या काळात पदवीधर स्त्रीला बॅन्क, पोस्ट,
शाळा, सरकारी ऑफिस अशा ठिकाणी नोकरी मिळत असे.
याच सूत्रानुसार मी शिक्षकी पेशात प्रवेश केला.
मला स्वतःला शिक्षकी पेशाची
आवड नव्हती. प्राप्त परिस्थितीनुसार मिळालेला पेशा मी प्रामाणिकपणे
सर्वस्व ओतून साकारला.
शिक्षकी पेशाने मला आयुष्यभर पुरेल असे एक ‘ग. ग.चे एक कुटुंब’ दिले.
श्रीमती प्रभा आठवले
(माजी शिक्षिका, ग. ग.
हायस्कूल, नाशिक)
क्रमशः
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
गोदाभूमीत प्रवेश :-
१९७० साली मी B.Ed.चीपरिक्षा पास झाले. B.Ed.ला ‘मराठी
व इंग्लिश’ ही Method घेतली.
लग्नाच्यावेळी मी फक्त इंटरआर्टस् होते. नवीन जीवनाला सुरवात झाली. सर्व परिस्थितीशी जुळवून घेण्यात
काळ घालवावाच लागतो. नवीन घर, घरातील माणसे,
दोन घरांतील रहाणीमानातील फरक, रिती-रिवाज भिन्न, नवीन गाव, तेथील स्थानिक
परिस्थिती माणसांच्या मनाची भिन्न घडण, या सर्व चक्रव्यूहातून
प्रत्येक स्त्रीला, आपली वाट शोधावी लागते. त्यामुळे शिक्षणात
खंड पडला. माझे मन ‘चूल आणि मूल’
ह्या रिंगणातून बाहेर
पडण्याचा प्रयत्न करु लागले. त्यातच नवीन अपत्याची चाहूल लागली आणि मनाला जबाबदारीची जाणीव होऊ लागली.
मुलाचे संगोपन, त्याचे शिक्षण, त्याच्या जीवनास योग्य वळण, त्याचा सर्व दृष्टीने विकास
व्हावयाचा असेल तर आर्थिक बाजू भक्कम व्हावयास
हवी; ह्या गोष्टीची तीव्र जाणीव
होऊ लागली, पण -----
माझी
मुलगी शाळेत जाऊ लागेपर्यंत, मला काहीच करणे शक्य नव्हते.
माझ्या मुलीने तोही प्रश्न लवकरच सोडविला. २ वर्षापासूनच
हट्टाने शाळेत जाणे सुरु केले. तिची शाळा, तिच्या मैत्रिणी ह्यात तिचा वेळ बाहेर जाऊ लागला. मला
विचार करावयास निवांत वेळ मिळाला. मन सांगू लागले, ‘आता शिक्षण पूर्ण कर.
माझी विद्यार्थीदशा सुरु झाली, मी S.T.C.
(Secondary Teachers Course)चा क्लास जॉईन केला.
क्लास संध्याकाळचा होता. दिवसभर काम, स्वयंपाकपाणी, पाहूणारावळा
ह्यातच वेळ संपायचा. संध्याकाळी S.T.C. च्या क्लासला जाणे सुरु झाले.
S.T.C.ला काही Lessons घ्यावे लागत.
लग्नाच्या आधी मी काही काळ
बुलढाण्याला शाळेत नोकरी केल्यामुळे,
मला ५०च्या ऐवजी ३० Lessons घ्यावे लागले.
त्या Lessons
साठी नाशिकमधील निरनिराळ्या
शाळांमध्ये मला पाठ घ्यावयास जावे लागे. एक चक्कर Unit साठी,
नंतर त्या शाळेचे वेळापत्रक पाहून त्याप्रमाणे Lesson साठी जावे लागे.Lesson साठी Teaching Aids तयार करावी लागत. एका हातात Lessonची File,Teaching Aids; दुसऱ्या हातात डस्टर-खडू, रोलप-फळा अशा थाटात वर्गात
प्रवेश करावा लागे. ह्या धावपळीत सर्व दिवस संपून जायचा.
एकदाची S.T.C.झाले. माझे
क्वॉलिफिकेशन ‘इंटर एस्. टी. सी.’ झाले, पण ह्या गुणवत्तेवर
नोकरी मिळण्यास अडचणी येऊ लागल्या.
काही दिवस शिकवण्या करुन पाहिल्या, पण त्यात
मन रमेना. एका वयस्कर बाईंना शिकविले. त्या
मॅट्रिक पास झाल्या. खाजगी बालवाडी शाळेत त्यांना नोकरी मिळाली
आणि मी त्यांची कायमची बाई झाले. कधी त्या आजी भेटल्या की, त्यांच्या नातींना ‘ह्या
माझ्या बाई अशी माझी ओळख करुन देत असत’. नातींना फार आश्चर्य
वाटे. आपल्या आजीच्या ह्या बाई आजीपेक्षा लहान वयाच्या कशा
? आज त्या आजी हयात नाहीत पण माझ्या ह्या पहिल्या विद्यार्थिनीने यशस्वी
शिक्षिका होऊन, मला खूप
समाधान दिले.
‘आपण
आता पदवी मिळवायची’ हा एकच ध्यास मनाने घेतला.
रात्रीचा S.N.D.T. चा क्लास सुरु केला.
पुन्हा धावपळीचे जीवन सुरु
झाले. एकदाची मी B.A.झाले. परत नोकरीसाठी प्रयत्न सुरु झाले, कारण आता मी पदवीधर होते ना ! पण तिथेही योग्य मार्ग
मला सापडेना. कुठे Part-Time तर कुठे Leave
vacancy त माझी नेमणूक व्हावयाची. काम पुष्कळ,
तात्पुरती नोकरी, अल्प वेतन ह्या चक्रातून सुटण्यासाठी
प्रयत्न सुरु झाले.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका - ग. ग. हायस्कूल, नाशिक
क्रमशः
मी बाई ‘बाई’ झाले !
नुकतेच नाशिकमध्ये ‘मराठा विद्या प्रसारक’तर्फे शिक्षणशास्त्र विद्यालय सुरु
झाले होते.मनाने एकच ध्यास घेतला B.Ed.व्हावयाचे.
सकाळचे कॉलेज, दुपारी Lessonsअशा
धावपळीत दिवस उगवायचा आणि संपायचा. विद्यार्थी
म्हणून अभ्यास- परिक्षा, विविध स्पर्धांमध्ये भाग तर घरी आल्यावर माता गृहिणी, कुटुंब- व्यवस्थापक अशा भुमिका पार
पाडताना; ‘जग ही रंगभूमी असून,
व्यक्ती ह्या रंगमंचावरील पात्रे आहेत’ ह्या वाक्याचे
प्रत्यंतर अनुभवयास मिळाले.
माझी B.Ed.ला इंग्लिश व मराठी मेथड होती. इंग्लिश शिकविणारे शिक्षक कमी म्हणून एक आशा होती. मी
B.Ed.ला मेथड म्हणून ‘इंग्लिश’ विषय घ्यावयास मागेपुढे पहात होते, कारण शिक्षणात बराच
खंड पडला होता. इंग्लिश ही परकीय भाषा. ‘व्याकरण’ हा भाषेचा मुख्य गाभा. शिक्षकीपेशाला ‘व्याकरणशुद्ध भाषा’ येणे आवश्यक, मग ती कोणतीही
भाषा असू दे. माझ्या मिस्टरांनी
मला सांगितले, “तुला B.Ed.होऊन नोकरी करावयाची
असेल तर तुला इंग्लिश हा विषय घ्यावाच लागेल, नाहीतर
B.Ed.होण्यात काही अर्थ नाही. फक्त मनाच्या समाधानासाठी
तू तुझ्या नावापुढे B.A.B.Ed.फक्त लिहू शकशील.”
मनाचा हिय्या केला व इंग्लिश भाषा मेथड म्हणून घेतली. दुसरा विषय सोपा म्हणून मातृभाषा मराठी घेतला. आमच्यावेळी
लेखी परिक्षा घेऊन, मेथडचे विषय देत असत. इंग्लिश, मराठी ह्या विषयांबरोबर ‘भूगोल’ ह्या विषयाची परिक्षा मी दिली. न जाणो इंग्लिशमध्ये आपण नापास झालो तर मनात धाकधुक होती. आश्चर्याचा धक्का म्हणजे मी तीनही विषयात
पास झाले. आता निर्णय घेणे माझ्या हातात
होते. मी इंग्लिश व मराठी हे दोन विषय निवडले.
आमच्याबरोबर एका शाळेचे मुख्याध्यापक होते. ते इंग्लिशमध्ये नापास झाले. इंग्रजी विषय घेणारे विद्यार्थी थोडे, त्यात परिक्षेत
पास होणारे अल्प ! अशा अल्पसंख्याकात मी पास होऊन समाविष्ट झाले.
‘ह्या बाई इंग्रजी विषयात पास कशा झाल्या?’ ह्याचे
त्या मुख्याध्यापकांना खूप आश्चर्य वाटायचे. शेवटी प्राचार्यांची विनवणी करुन, त्यांना ‘इंग्लिश’ विषय मिळाला.वर्षभर विद्यार्थी
जीवन enjoy करीत मी
B.Ed.ची परिक्षा पास झाले. मी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
होऊन, मी बेकारीच्या चक्रातून बाहेर
पडण्याचा प्रयत्न करायला लागले.
नोकरीसाठी अर्ज खरडणे सुरु झाले.
एक आशा मात्र निश्चित होती की, आपल्याला नोकरी
निश्चित मिळेल; पण ‘केव्हा? आणि कोठे?’ हा प्रश्न अधांतरी होता. प्रतिक्षा करण्यात १५ दिवस निघून गेले. आता मात्र मनांत शंका येऊ लागली, ‘आपण कुठेही वशिला लावू
शकत नाही. कारण ते मनाला पटत नव्हते. आपल्या
अर्जाला केराच्या टोपलीत स्थान!’ १५ दिवसांनी मुलाखतीच्या बोलाविण्याची
पत्रे येऊ लागली. तारखा निरनिराळ्या होत्या, म्हणून बरे.
आपल्या गुणपत्रिकांची फाईल घेऊन शाळांमध्ये जावे लागे. एका ठिकाणी फाईल पाहून, निवड समितीतल्या एकांनी विचारले,
“दिंडोरीला जायची तयारी आहे का? आता ऑर्डर हातात
देतो.” मी दिंडोरीला जाणे शक्य नव्हते. ‘नाही’ काही म्हटले नाही. हुकमी
एक्का हातात ठेवून सांगितले, “विचार करुन सांगते” आणि घरी परत आले.
२-३ ठिकाणी मुलाखतीला जाऊन आले. तिथे खूप उमेदवार होते, काही फर्स्ट क्लास M.A.,M.Com.,M.Sc.
माझे धाबे दणाणले ह्यातून आपला निभाव लागणे अशक्य. मुलाखती दिल्या पण वाट पहाणे सोडून दिले.
काही दिवस असेच गेले, मार्ग सापडेना !
जून महिना सुरु झाला. एके दिवशी ग. ग. हायस्कूल (नाशिक)चा शिपाई दुपारचा घरी आला आणि सांगायला लागला, “तुम्हाला
मोठ्याबाईंनी ताबडतोब बोलाविले आहे.” मी झटपट तयार झाले व शाळेच्या
आवारांत प्रवेश केला. ती भव्य दगडी इमारत, गर्द झाडीमध्ये कारंजा, त्यात मासे-कमळे पाहून मी भांबावले. मनांत विचार, ‘मोठ्याबाईंनी कशाला बोलाविले? नेमणूकीसाठी तर बोलाविले
नसेल ना?’
गोंधळलेल्या मनःस्थितीत
मी ऑफीसमध्ये प्रवेश केला. बेताची उंची, स्थूल बांधा, गोऱ्यापान, सुंदर, मोठ्या केशसंभारावर माळलेली फुले, हंसतमुख अशा बाईंनी माझे स्वागत केले. मला बसावयास सांगितले. त्या म्हणाल्या, “तुमच्या नेमणूकीची ४ शाळांमधून पत्रे निघालेली आहेत. आमच्या शाळेचे नेमणूकीचे पत्र तुम्हाला येईल.
आमची शाळा त्या शाळांपेक्षा उशीरा सुरु होईल तरी तुम्ही दुसऱ्या शाळेची
नेमणूक स्वीकारु नका. १५ जूनला आमची शाळा सुरु होते. बरोबर ११ वाजता हजर व्हा. नेमणूकपत्र उशीरा येईल.
काळजी करु नका. हजर झालेल्या दिवसांपासून तुमचा
सेवाकाल सुरु होईल.” हे ऐकून मी स्वप्नांत तर नाही ना!
असे मला क्षणभर वाटले. हवेत तरंगतच मी आनंदात घरी
केव्हा पोहोचले? ते मला समजले नाही.
दि. १५ जून १९७० ला मी ग. ग.
शाळेत शिक्षिका म्हणून हजर झाले. त्याकाळी इतर
शाळांमधील शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळत नव्हते. ग. ग. हायस्कूल सरकारी शाळा असल्याने, मला सेवानिवृत्ती वेतन मिळणार होते.
खऱ्या अर्थाने मी ‘बाई’ झाले. आत्तापर्यंत समाज मला ‘आठवलेबाई’
म्हणून ओळखत होता. कारण विवाहानंतर माझे आडनाव
‘आठवले’ झाले होते. मोलकरीण मला ‘बाई’ म्हणत असे किंवा
रस्त्यात कोणी अनोळखी व्यक्ति, “अहो बाई” म्हणून संबोधत असे.
ग ग हायस्कूल विद्यार्थिनींची ‘आमच्या बाई’ ह्या उपाधीने मी ‘आठवलेबाई’
म्हणून समाजात मान्यता पावले.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका - ग.
ग. हायस्कूल, नाशिक
ग. ग. चे
संस्कार रंग :-
शाळा चालू झाली
- दि १५ जून १९७० - शाळेत प्रवेश करावयाचा म्हणजे व्यवस्थित पोशाख, पर्स, पर्समध्ये पेन, चष्मा,
पेन्सिल, खोडरबर, डायरी,
ब्लेड, रुमाल, छत्री,
पाण्याची छोटी बाटली असा सर्व सरंजाम सांभाळावा लागतो. त्याचबरोबर वेळेचे बंधन. आता हातावरील घड्याळ ही शोभेची वस्तू
राहिली नाही तर वेळोवेळी वेळेचे भान ठेवण्यासाठी, त्याचा उपयोग होऊ लागला.
शाळा सकाळी
११:१० ला सुरु शाळेची घंटा घणघणू लागली की शाळेचे आवार विद्यार्थिनी,
शिक्षक, शिपाई, कर्मचारी
ह्यांनी फुलून जायचे. शाळेची पहिली शिस्त - वेळेच्या आधी ५ मिनिटे हजर राहिलेच पाहिजे.
शाळेची
सुरुवात सेंट्रल हॉलमधील प्रार्थनेने व्हावयाची. प्रार्थना वाद्य,संगीताच्या तालावर व्हावयास पाहिजे. शिक्षकांसमवेत सर्व
वर्गाच्या रांगा,
आगगाडीच्या डब्यांप्रमाणे सेंट्रल हॉलमध्ये आपआपल्या जागेवर स्थिर व्हावयास
हव्या. प्रार्थना हॉलमध्ये पूर्ण शांतता हवी. आमच्या शाळेची शिस्त फार कडक, कारण मुख्याध्यापिका शिस्तप्रिय. ‘अभ्यास एके अभ्यास’ हे त्यांचे धोरण नव्हते. विद्यार्थ्यांचा ‘सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण’
ह्या दृष्टीकोनातून सर्व उपक्रम राबविले जात होते. प्रार्थनेनंतर वर्गांप्रमाणे दिनविशेष, तिथी,
वार, सवंत्सर, मराठी महिना,
इंग्लीश महिना, साल, नक्षत्र
वगैरे माहिती
विद्यार्थिनी सांगायच्या. मुलींचे-शिक्षकांचे
वाढदिवस, शाळेच्या बागेतील फूल देऊन साजरे व्हायचे. वर्तमान पत्रातील घडामोडी, शास्त्रज्ञांची माहिती, नवीन लागलेला शोध वगैरे
अनंत गोष्टींचा परामर्श, विद्यार्थिनींमार्फत शिक्षकांना
घ्यावा लागे. वर्गातील प्रत्येक मुलीचा सहभाग पाळी-पाळीने होत असे. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंधांत जवळीक निर्माण होत असे. गुरु-शिष्य संबंध नकळत दृढ
व्हावयाचे. आपल्या वर्गाकडे दिलेली कामगिरी
उत्कृष्टपणे सादर करण्यात अहमिका लागावयाची.
त्यातच श्रीमद् भगवद् गीतेचा १५वा अध्याय, ९वा अध्याय तालासुरांत सामुहिकरित्या म्हटला जायचा. एखादे
देशभक्तीपर गीत सर्व शाळेतर्फे बसविण्यात यायचे.
अशा लांबलचक
कार्यक्रमांच्या पूर्तीनंतर प्रार्थना संपावयाची. सर्व वर्गांनी
शिस्तीत परत जावयास हवे. त्यानंतर तासाप्रमाणे
अध्ययन-अध्यापन सुरु व्हावयाचे. मधल्या सुट्टीच्या ३ तासिका आधी १०मिनिटांची सुट्टी असायची.
मधल्या सुट्टीत
पोळी-भाजी, भाकरी-भाजीचा डबा खायचा. डब्यात लाडू- चिवडा, मिठाई,
बिस्किटे ह्यांना बंदी होती. मधून - मधून शिक्षकांना डब्यांची तपासणी करावी लागत असे. श्रीमंत-गरीब उच्च-नीच असा आप-परभाव निर्माण
होऊ नये, म्हणून प्रत्येक वर्गाने गोल
करुन, झाडाखाली डबा खावयास पाहिजे, ही शिस्त.
शाळा सुटण्याच्या
आधी शेवटचा ९वा तास खेळाचा. शिक्षकांसहित सर्व विद्यार्थिनींनी, शाळेच्या पटांगणांवर खेळलेच पाहिजे,
ही शाळेची शिस्त.
रोज दुपारी
व शनिवारी
सकाळी शाळेच्या वेळात कोणीही बाहेर जायचे नाही. जायचे असल्यास,
परवानगी काढावी लागे; अगदी शिक्षकांना सुद्धा.
आमच्या मुख्याध्यापिका ह्या एक आदर्श शिक्षिका तर होत्याच त्यात उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञ
होत्या. ‘शिक्षण म्हणजे संस्कार’
हा मंत्र त्यांनी कार्यान्वित केला. शाळेत निवडणुका
होऊन विद्यार्थिनींचे मंत्रिमंडळ कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांभाळायचे. लोकशाही कारभाराचे धडे विद्यार्थीदशेत आपोआप
मिळायचे. संपूर्ण शाळेची विविध गटांमध्ये
विभागणी केली जायची. प्रत्येक गटात ५वी ते ११वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश असायचा.
असा हा लहान-थोर मुलींच्या गटांचे एक कुटुंब बनायचे.
ह्या गटांमध्ये खेळ, नाटक, भजने, कविता कथा-कथन, स्वच्छता, समूहगीत,
भावगीत, भजने, पुष्परचना, रांगोळी अशा अनंत स्पर्धा व्हावयाच्या. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व, संगीत, नेतृत्व,अनुयायित्व,एकात्मता, सामाजिक बांधिलकी अशा विविध गुणांची
जोपासना नकळत व्हावयाची. उत्साही कार्यतत्पर मुख्याध्यापिकेच्या सहवासात शिक्षिकाही आपोआप तयार व्हावयाच्या.
शाळेच्या
सेंट्रल हॉलच्या भिंती जवळ-जवळ २०० नकाशांनी सुशोभित केलेल्या होत्या. भारतातील तसे महाराष्ट्रातील पिक-पाणी, लोकवस्ती, नद्या, खनिजे, प्रसिद्ध शहरे ह्यांचे आकर्षक नकाशे मोठ्या प्रमाणावर
विद्यार्थिनींच्या सहाय्याने शिक्षकांनी तयार करुन घेतले होते. हंसत-खेळत चालता-बोलता इतिहास-भूगोल सदैव शाळेच्या नजरेसमोर उभा राहिला.
एवढे
प्रचंड उपक्रम राबवीत असताना, शालेय अभ्यासक्रम कुठेही मागे राहिले नाहीत. स्कॉलरशिप ७वी च्या परिक्षेसाठी हुशार मुलींची तयारी शिक्षक शाळेत जास्त वेळ
थांबून करुन घेत असत. ह्या क्लासबरोबर इंग्लिश, हिंदी, ड्रॉईंगच्या शाला-बाह्य
परिक्षांसाठी त्या-त्या विषयांच्या विषय शिक्षकांवर शाळेत क्लास
घ्यायची, जबाबदारी टाकली जायची. सर्व शिक्षक
सुट्टीच्या दिवशी तसेच लवकर शाळेत येऊन हे काम निष्ठेने पार पाडायचे. मुख्य म्हणजे ह्या क्लासला कोणतीही फी आकारली जायची नाही. बाहेरच्या जगातील परिक्षा नुसत्या पास होऊन चालायचे नाही. प्रत्येक विद्यार्थिनीचे व त्याबरोबर वर्गाचे percentage वाढले पाहिजे. ह्यावर आमच्या मोठ्या बाईंच्या कटाक्ष असे. आमच्या विद्यार्थिनी
बाह्य विश्वातील यश स्व-मेहनतीने खेचून आणायच्या.
२६ जानेवारी
१५ ऑगस्ट थाटात व रुबाबात साजरे व्हावयाचे. सर्व शाळांची पोलीस-परेड ग्राऊंडवर २ आठवडे
आधी एकत्रित तालीम चालायची. सर्वांचा गणवेश स्वच्छ पाहिजे. हिरवा स्कर्ट,
पांढरा ब्लाऊज, लाल रिबीनींनी वर बांधलेल्या दोन
वेण्या हा ग. ग. चा गणवेश. शालेय गणवेशाचे
वार – ‘सोमवार, बुधवार, शनिवार’. ज्या मुलींकडे एकच गणवेश असेल, त्यांना तो
धुऊन वाळवून घालता यावा, हा उदात्त हेतू. वाढदिवसाच्या दिवशी गणवेश न घालण्याची मुभा होती. राष्ट्रीय सणांना ५वी ते ११वी सहभाग असावा,
ही मोठ्याबाईंची अपेक्षा असे. हजेरी घेतली जात
असे. अनुपस्थित राहिल्यास, पालकांच्या चिठ्या
आणल्या पाहिजेत; ही शिस्त. शालेय जीवनांत
राष्ट्रीयतेची जाणीव असावी, हा मोठ्या बाईंचा उद्देश.
संक्रातीचे-शुक्रवारचे हळदकूंकू, पंढरपूरची दिंडी, स्नेहसंमेलन वगैरे विविध कार्यक्रम राबविले जायचे. शाळेत आलेल्या फ्रेंच पाहुण्यांसाठी भारतीय विवाह
सोहळा, बांगला देश मुक्ती युद्धाच्या
नकाशाच्या सहाय्याने मोठ्याबाईंनी सांगितलेल्या ताज्या युद्ध
घडामोडी, मुलींनी साकारलेली शिवशाही, तसेच ऑक्रेस्ट्रा असे सेंट्रल हॉलमध्ये मुलींनी साजरे केलेले कार्यक्रम आजही
आठवतात.
शाळेच्या वर्गाबाहेरील
फलकांवर नित्य-नवीन माहिती सदैव लिहिली जायची. मुलींची शाळा असल्यामुळे होम-सायन्स, शिवण हे विषय चित्रकला-गायना इतकेच महत्वाचे मानले जायचे.
संक्रान्तीचे लाडू होमसायन्स डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थिनींकडून बनविले
जात. परसातील बागकाम मेथी, कोथिबींर,
भाज्या वगैरेंचा छोटेखानी बाजार भरवत असे. भाजीवाल्या
चिमुरड्या मुली त्याचा खूप आनंद लुटत असत. शिक्षकांच्या देखरेखीखाली स्नेहसंमेलनाचा नास्ता, होमसायन्समध्ये विद्यार्थिनी
बनवायच्या; ‘स्वच्छ-स्वस्त-मस्त’ होई.
हरितालिकेचे
जागरण, सहली वगैरे विविध उपक्रमांमुळे
अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. शाळेचे रिझल्ट चांगलेच पाहिजेत. इन्स्पेक्शन रिपोर्ट
चांगलाच हवा. ही सर्व तारेवरची कसरत असे, कुरकुर करावयास जागाच नव्हती. त्यातच शाळेचा सुवर्ण-महोत्सव धुमधडाक्यात पार पडला. शाळेतील नावारुपाला आलेल्या माजी विद्यार्थिनींना निमंत्रणे गेलीच पण गृहिणी
म्हणून वावरत असलेल्या विद्यार्थिनींची शाळेने आवर्जून आठवण ठेवली.
अशा ह्या आमच्या मुख्याध्यापिका व्यासंगी, कल्पक,
शिक्षणासंबधी सखोल विचार करणाऱ्या आनंदी, उत्साही होत्या. पण त्यांना
B.P.चा त्रास असल्यामुळे, काहीवेळा खूप संतापायच्या.
असे हे बुद्धीमत्तेचे तेज असलेले सौंदर्य, रागाने
लालेलाल झाले की, मात्र सर्वांना खूप भिती वाटायची.
‘शाळा
हेच आपले घर’ समजणाऱ्या सौ. आशाताई राजदेरकरबाई
(मोठ्याबाई) ११ सप्टेंबर १९७५ ह्या दिवशी
सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीच्या वेळी त्या खूप गहिवरुन
आल्या. ‘माझी शाळा’ ह्या भावनेने त्या शाळेत
मधून-मधून यावयाच्या.
शाळा सोडली
त्यानंतर काही वर्षांनी
वृद्धापकाळाने जगाचा निरोप घेऊन दुसऱ्या जगात आपल्या कल्पना प्रत्यक्षांत
राबविण्यासाठी त्या निघून गेल्या.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका - ग.
ग. हायस्कूल, नाशिक
क्रमशः
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.