आठवणी

      आदरणीय  सरिता उजागरेबाईं (माजी मुख्याध्यापिका ग. ग. हायस्कूल, नाशिक) च्या गुणग्राहकतेची अजरामर आठवण
सौ. मंजिरी चौधरी (सुमंत) सी. ए. मुंबई ह्यांनी शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवण पाठविली. सौ मंजिरीताईंचे मनःपूर्वक आभार.
समस्त ग. ग. परिवार, नाशिक



आदरणीय कै. सुमन पुरोहितबाई  :-                 
                           दि. २ ऑक्टोबर ही तारीख आठवण करुन देते, खूप अल्प काळ अनुभविलेल्या परंतु मनावर ठसा उमटवून गेलेल्या, आदरणीय कै. सुमन पुरोहितबाईंची.

‘हाती धरुन झाडू, तू मार्ग  दाखविलासी’
ह्या गीतातून व्यक्त होणारे ‘महात्मा गांधी’
तसेच
‘जय जवान, जय किसान’ 
   दिशा देशाला देणारे लाल बहाद्दुर शास्त्रीजी


                     जयंती ( दि.१४ एप्रिल १९३०),
                     पुण्यतिथी ( दि.१५ जुलै २०१५)
 आमच्या शालेय जीवनांत ह्या दोन्ही महापुरुषांची  (दि. २ ऑक्टोबर) जयंती  धुमधडाक्यात साजरे होत असे .
                              ग. ग. हायस्कूलमध्ये गटा - गटांनी शाळा सजविण्याची स्पर्धा जाहीर झाली होती. ५ वी ते ११ वी अशा विविध इयत्तांमधील विद्यार्थिनींना एकत्रित करुन शाळेत गट तयार केले जायचे. त्यामुळे आपोआप लहान व मोठ्या वर्गातल्या मुली, स्वतःच्या वर्ग ह्या कोषातून बाहेर पडून, ‘गट’ ह्या कुटुंबात दाखल होत असत.
                              आमच्या गटाचा वर्ग सजविण्याचे काम वरच्या वर्गातील मुली करीत होत्या. आम्हा ५वी- ६वीतील बच्चे कंपनीला, इतर गट आपआपले वर्ग कशा प्रकारे सजवित आहेत ? हे गुपचूप पाहून येऊन बातमी देण्याचे काम दिलेले होते. आम्ही हे काम मोठ्या खुषीत, इमान इतबारे करीत होतो. सर्व शाळेत आमचा वर्ग वरच्या मजल्यावरील उजव्या कोपऱ्यातील शेवटचा हॉल होता, अर्थात खूप मोठा वर्ग. आमच्या ज्येष्ठ मैत्रिणींनी घरुन तऱ्हेतऱ्हेच्या फ्रेमस् ,फ्लॉवर पॉट, बाहुल्या वगैरे खूप छान वस्तू आणल्या होत्या.
                         स्वाभाविकच आमचा वर्ग सर्व शाळेत सर्वात सुंदर सजविला गेला होता. आमच्या बाल हेरगिरीनूसार पहिले बक्षीस आमच्या गटाचे निश्चित होते.
                 परीक्षक म्हणून माननीय पुरोहित बाई आल्या. आम्ही सर्व विद्यार्थिनी खुषीत त्यांचे स्वागत करीत होतो. अचानक पुरोहितबाईंनी आमच्या वर्गात ठेवलेल्या पुस्तकांच्या कपाटाखाली डोकावून पाहिले. ज्येष्ठ मैत्रिणींचा चेहरा उतरला. आमचा बाल चमू गांगारुन गेला. ‘काय झाले?’ आम्हाला कळाले नाही.
                       निकाल सांगताना पुरोहितबाईंनी आमच्या गटाचे नाव न घेता सांगितले, “एका गटाने घरच्या वस्तू आणून, वर्ग खूप मेहनतीने छान सजविलेला होता. परंतु वर्ग किंवा आपले घर सजविणे म्हणजे कानाकोपऱ्यातून स्वच्छ करणे. ह्या गटाने वर्ग झाडताना, कपाटाखालची धूळ स्वच्छ केलेली नव्हती, उलटपक्षी वर्गातील कचरा कपाटाखाली ढकलून दिलेला होता. आपण रहातो तो परिसर, घर, वर्ग कानाकोपऱ्यातून स्वच्छ करण्यास शिकणे हे आजच्या दिवसाचे महत्त्व आहे. वर्ग सजविताना घरुन वस्तू आणणे, हे ह्या स्पर्धेत अपेक्षित नाही.”
                         त्या लहान वयात ‘स्वच्छता म्हणजे काय?’ हे आम्ही मुली न कळत शिकलो.
                       त्या काळांत आमच्या शाळेत इंटरकॉम ह्या नवतंत्रज्ञानाचा प्रवेश झाला. आमच्या मोठ्याबाई (सौ. आशाताई राजदेरकर) सर्व शाळेशी ऑफिसमध्ये बसून संपर्क साधू शकायच्या. लहानपणी  इंटरकॉमद्वारे ऐकू येणाऱ्या मोठ्याबाईंच्या  आवाजाची गंमत वाटायची, कारण त्या प्रत्यक्ष आम्हाला दिसायच्या नाहीत.
                       ह्या इंटरकॉमवर पुरोहितबाईंनी इंग्रजीत केलेल्या कवितेच्या पहिल्या ओळी आजची लक्षात आहेत,
‘Intercom, Intercom is an Atombomb’
 इंटरकॉमवरील त्यांच्या कवितेतून जाणवितो, तो त्यांचा वेळप्रसंगी स्पष्ट मत व्यक्त करणारा स्वभाव. पुरोहितबाईंची बदली झाली. सर्व शाळेची मैत्रीण असलेल्या पुरोहितबाई अल्पकाळातही आमच्या आठवणीत त्या चिरंजीव राहिल्या.


माननीय पुरोहितबाईंची माहिती (जयंती व पुण्यतिथी सहित व फोटो) त्यांचे भाचे श्री. हृषीकेश गोपाळ पुरोहित यांनी Whatsappद्वारे दिली.  श्री. पुरोहितसाहेब महत्वाच्या कामांत गुंतलेले असतानाही, त्यांनी आपल्या ग. ग. शाळेच्या ब्लॉगसाठी  सहकार्य केले. समस्त पुरोहित परिवारास धन्यवाद.


1 comment:

  1. स्वच्छतेचा पहिला धडा शिकविणाऱ्या कै. सुमन पुरोहितबाई (ग. ग. हायस्कूल, नाशिक)

    ReplyDelete

आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.