ग. ग. चे
संस्कार रंग :-
शाळा चालू झाली
- दि १५ जून १९७० - शाळेत प्रवेश करावयाचा म्हणजे व्यवस्थित पोशाख, पर्स, पर्समध्ये पेन, चष्मा,
पेन्सिल, खोडरबर, डायरी,
ब्लेड, रुमाल, छत्री,
पाण्याची छोटी बाटली असा सर्व सरंजाम सांभाळावा लागतो. त्याचबरोबर वेळेचे बंधन. आता हातावरील घड्याळ ही शोभेची वस्तू
राहिली नाही तर वेळोवेळी वेळेचे भान ठेवण्यासाठी, त्याचा उपयोग होऊ लागला.
शाळा सकाळी
११:१० ला सुरु शाळेची घंटा घणघणू लागली की शाळेचे आवार विद्यार्थिनी,
शिक्षक, शिपाई, कर्मचारी
ह्यांनी फुलून जायचे. शाळेची पहिली शिस्त - वेळेच्या आधी ५ मिनिटे हजर राहिलेच पाहिजे.
शाळेची
सुरुवात सेंट्रल हॉलमधील प्रार्थनेने व्हावयाची. प्रार्थना वाद्य,संगीताच्या तालावर व्हावयास पाहिजे. शिक्षकांसमवेत सर्व
वर्गाच्या रांगा,
आगगाडीच्या डब्यांप्रमाणे सेंट्रल हॉलमध्ये आपआपल्या जागेवर स्थिर व्हावयास
हव्या. प्रार्थना हॉलमध्ये पूर्ण शांतता हवी. आमच्या शाळेची शिस्त फार कडक, कारण मुख्याध्यापिका शिस्तप्रिय. ‘अभ्यास एके अभ्यास’ हे त्यांचे धोरण नव्हते. विद्यार्थ्यांचा ‘सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण’
ह्या दृष्टीकोनातून सर्व उपक्रम राबविले जात होते. प्रार्थनेनंतर वर्गांप्रमाणे दिनविशेष, तिथी,
वार, सवंत्सर, मराठी महिना,
इंग्लीश महिना, साल, नक्षत्र
वगैरे माहिती
विद्यार्थिनी सांगायच्या. मुलींचे-शिक्षकांचे
वाढदिवस, शाळेच्या बागेतील फूल देऊन साजरे व्हायचे. वर्तमान पत्रातील घडामोडी, शास्त्रज्ञांची माहिती, नवीन लागलेला शोध वगैरे
अनंत गोष्टींचा परामर्श, विद्यार्थिनींमार्फत शिक्षकांना
घ्यावा लागे. वर्गातील प्रत्येक मुलीचा सहभाग पाळी-पाळीने होत असे. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंधांत जवळीक निर्माण होत असे. गुरु-शिष्य संबंध नकळत दृढ
व्हावयाचे. आपल्या वर्गाकडे दिलेली कामगिरी
उत्कृष्टपणे सादर करण्यात अहमिका लागावयाची.
त्यातच श्रीमद् भगवद् गीतेचा १५वा अध्याय, ९वा अध्याय तालासुरांत सामुहिकरित्या म्हटला जायचा. एखादे
देशभक्तीपर गीत सर्व शाळेतर्फे बसविण्यात यायचे.
अशा लांबलचक
कार्यक्रमांच्या पूर्तीनंतर प्रार्थना संपावयाची. सर्व वर्गांनी
शिस्तीत परत जावयास हवे. त्यानंतर तासाप्रमाणे
अध्ययन-अध्यापन सुरु व्हावयाचे. मधल्या सुट्टीच्या ३ तासिका आधी १०मिनिटांची सुट्टी असायची.
मधल्या सुट्टीत
पोळी-भाजी, भाकरी-भाजीचा डबा खायचा. डब्यात लाडू- चिवडा, मिठाई,
बिस्किटे ह्यांना बंदी होती. मधून - मधून शिक्षकांना डब्यांची तपासणी करावी लागत असे. श्रीमंत-गरीब उच्च-नीच असा आप-परभाव निर्माण
होऊ नये, म्हणून प्रत्येक वर्गाने गोल
करुन, झाडाखाली डबा खावयास पाहिजे, ही शिस्त.
शाळा सुटण्याच्या
आधी शेवटचा ९वा तास खेळाचा. शिक्षकांसहित सर्व विद्यार्थिनींनी, शाळेच्या पटांगणांवर खेळलेच पाहिजे,
ही शाळेची शिस्त.
रोज दुपारी
व शनिवारी
सकाळी शाळेच्या वेळात कोणीही बाहेर जायचे नाही. जायचे असल्यास,
परवानगी काढावी लागे; अगदी शिक्षकांना सुद्धा.
आमच्या मुख्याध्यापिका ह्या एक आदर्श शिक्षिका तर होत्याच त्यात उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञ
होत्या. ‘शिक्षण म्हणजे संस्कार’
हा मंत्र त्यांनी कार्यान्वित केला. शाळेत निवडणुका
होऊन विद्यार्थिनींचे मंत्रिमंडळ कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांभाळायचे. लोकशाही कारभाराचे धडे विद्यार्थीदशेत आपोआप
मिळायचे. संपूर्ण शाळेची विविध गटांमध्ये
विभागणी केली जायची. प्रत्येक गटात ५वी ते ११वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश असायचा.
असा हा लहान-थोर मुलींच्या गटांचे एक कुटुंब बनायचे.
ह्या गटांमध्ये खेळ, नाटक, भजने, कविता कथा-कथन, स्वच्छता, समूहगीत,
भावगीत, भजने, पुष्परचना, रांगोळी अशा अनंत स्पर्धा व्हावयाच्या. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व, संगीत, नेतृत्व,अनुयायित्व,एकात्मता, सामाजिक बांधिलकी अशा विविध गुणांची
जोपासना नकळत व्हावयाची. उत्साही कार्यतत्पर मुख्याध्यापिकेच्या सहवासात शिक्षिकाही आपोआप तयार व्हावयाच्या.
शाळेच्या
सेंट्रल हॉलच्या भिंती जवळ-जवळ २०० नकाशांनी सुशोभित केलेल्या होत्या. भारतातील तसे महाराष्ट्रातील पिक-पाणी, लोकवस्ती, नद्या, खनिजे, प्रसिद्ध शहरे ह्यांचे आकर्षक नकाशे मोठ्या प्रमाणावर
विद्यार्थिनींच्या सहाय्याने शिक्षकांनी तयार करुन घेतले होते. हंसत-खेळत चालता-बोलता इतिहास-भूगोल सदैव शाळेच्या नजरेसमोर उभा राहिला.
एवढे
प्रचंड उपक्रम राबवीत असताना, शालेय अभ्यासक्रम कुठेही मागे राहिले नाहीत. स्कॉलरशिप ७वी च्या परिक्षेसाठी हुशार मुलींची तयारी शिक्षक शाळेत जास्त वेळ
थांबून करुन घेत असत. ह्या क्लासबरोबर इंग्लिश, हिंदी, ड्रॉईंगच्या शाला-बाह्य
परिक्षांसाठी त्या-त्या विषयांच्या विषय शिक्षकांवर शाळेत क्लास
घ्यायची, जबाबदारी टाकली जायची. सर्व शिक्षक
सुट्टीच्या दिवशी तसेच लवकर शाळेत येऊन हे काम निष्ठेने पार पाडायचे. मुख्य म्हणजे ह्या क्लासला कोणतीही फी आकारली जायची नाही. बाहेरच्या जगातील परिक्षा नुसत्या पास होऊन चालायचे नाही. प्रत्येक विद्यार्थिनीचे व त्याबरोबर वर्गाचे percentage वाढले पाहिजे. ह्यावर आमच्या मोठ्या बाईंच्या कटाक्ष असे. आमच्या विद्यार्थिनी
बाह्य विश्वातील यश स्व-मेहनतीने खेचून आणायच्या.
२६ जानेवारी
१५ ऑगस्ट थाटात व रुबाबात साजरे व्हावयाचे. सर्व शाळांची पोलीस-परेड ग्राऊंडवर २ आठवडे
आधी एकत्रित तालीम चालायची. सर्वांचा गणवेश स्वच्छ पाहिजे. हिरवा स्कर्ट,
पांढरा ब्लाऊज, लाल रिबीनींनी वर बांधलेल्या दोन
वेण्या हा ग. ग. चा गणवेश. शालेय गणवेशाचे
वार – ‘सोमवार, बुधवार, शनिवार’. ज्या मुलींकडे एकच गणवेश असेल, त्यांना तो
धुऊन वाळवून घालता यावा, हा उदात्त हेतू. वाढदिवसाच्या दिवशी गणवेश न घालण्याची मुभा होती. राष्ट्रीय सणांना ५वी ते ११वी सहभाग असावा,
ही मोठ्याबाईंची अपेक्षा असे. हजेरी घेतली जात
असे. अनुपस्थित राहिल्यास, पालकांच्या चिठ्या
आणल्या पाहिजेत; ही शिस्त. शालेय जीवनांत
राष्ट्रीयतेची जाणीव असावी, हा मोठ्या बाईंचा उद्देश.
संक्रातीचे-शुक्रवारचे हळदकूंकू, पंढरपूरची दिंडी, स्नेहसंमेलन वगैरे विविध कार्यक्रम राबविले जायचे. शाळेत आलेल्या फ्रेंच पाहुण्यांसाठी भारतीय विवाह
सोहळा, बांगला देश मुक्ती युद्धाच्या
नकाशाच्या सहाय्याने मोठ्याबाईंनी सांगितलेल्या ताज्या युद्ध
घडामोडी, मुलींनी साकारलेली शिवशाही, तसेच ऑक्रेस्ट्रा असे सेंट्रल हॉलमध्ये मुलींनी साजरे केलेले कार्यक्रम आजही
आठवतात.
शाळेच्या वर्गाबाहेरील
फलकांवर नित्य-नवीन माहिती सदैव लिहिली जायची. मुलींची शाळा असल्यामुळे होम-सायन्स, शिवण हे विषय चित्रकला-गायना इतकेच महत्वाचे मानले जायचे.
संक्रान्तीचे लाडू होमसायन्स डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थिनींकडून बनविले
जात. परसातील बागकाम मेथी, कोथिबींर,
भाज्या वगैरेंचा छोटेखानी बाजार भरवत असे. भाजीवाल्या
चिमुरड्या मुली त्याचा खूप आनंद लुटत असत. शिक्षकांच्या देखरेखीखाली स्नेहसंमेलनाचा नास्ता, होमसायन्समध्ये विद्यार्थिनी
बनवायच्या; ‘स्वच्छ-स्वस्त-मस्त’ होई.
हरितालिकेचे
जागरण, सहली वगैरे विविध उपक्रमांमुळे
अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. शाळेचे रिझल्ट चांगलेच पाहिजेत. इन्स्पेक्शन रिपोर्ट
चांगलाच हवा. ही सर्व तारेवरची कसरत असे, कुरकुर करावयास जागाच नव्हती. त्यातच शाळेचा सुवर्ण-महोत्सव धुमधडाक्यात पार पडला. शाळेतील नावारुपाला आलेल्या माजी विद्यार्थिनींना निमंत्रणे गेलीच पण गृहिणी
म्हणून वावरत असलेल्या विद्यार्थिनींची शाळेने आवर्जून आठवण ठेवली.
अशा ह्या आमच्या मुख्याध्यापिका व्यासंगी, कल्पक,
शिक्षणासंबधी सखोल विचार करणाऱ्या आनंदी, उत्साही होत्या. पण त्यांना
B.P.चा त्रास असल्यामुळे, काहीवेळा खूप संतापायच्या.
असे हे बुद्धीमत्तेचे तेज असलेले सौंदर्य, रागाने
लालेलाल झाले की, मात्र सर्वांना खूप भिती वाटायची.
‘शाळा
हेच आपले घर’ समजणाऱ्या सौ. आशाताई राजदेरकरबाई
(मोठ्याबाई) ११ सप्टेंबर १९७५ ह्या दिवशी
सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीच्या वेळी त्या खूप गहिवरुन
आल्या. ‘माझी शाळा’ ह्या भावनेने त्या शाळेत
मधून-मधून यावयाच्या.
शाळा सोडली
त्यानंतर काही वर्षांनी
वृद्धापकाळाने जगाचा निरोप घेऊन दुसऱ्या जगात आपल्या कल्पना प्रत्यक्षांत
राबविण्यासाठी त्या निघून गेल्या.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका - ग.
ग. हायस्कूल, नाशिक
क्रमशः
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.