घड्याळात
सकाळचे ११ वाजले होते. एक उंच,
धिप्पाड, चष्मा लावलेली, नीटनेटका पोशाख केलेली, केस काळेभोर, मानेवर केसांचे चक्कर, त्यावर गुलाबाचे
फुल; रंग काळा पण रुबाबात झाकून गेलेला, अशी व्यक्ती जिना चढून क्लार्कच्या ऑफीसमध्ये आली. क्लार्क
मंडळी पहातच राहिली. ही व्यक्ती
कोण? त्या व्यक्तीने आपली ओळख
दिली. “मी या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून शाळेत
रुजू होत आहे.” क्लार्क कंपनी अंधारात होती. त्यांना कोणतीच कल्पना नव्हती; पण वेळेतच सावरुन त्यांनी नमस्कार करुन बसावयास खुर्ची दिली. अशी आमच्या उजागरेबाईंची शाळेतील कारकिर्द सुरु झाली. त्यांचे नाव आम्ही नाशिककर ऐकून होतो. रमाबा ई विद्यालयात
त्या Deputationवर मुख्याध्यापिका म्हणून काम
पहात असताना ‘कडक शिस्तीच्या बाई’
अशी किर्ती आम्ही ऐकलेली होती.
त्यांनी
शाळेतील पूर्वीच्या प्रथा तशाच कायम ठेवल्या. सामुदायिक प्रार्थना,
दिनविशेष, वाढदिवस, राष्ट्रीय
गीत, महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणे वगैरे उपक्रम मागील पानावरुन
पुढे शिस्तबद्ध चालू ठेवले. हळू हळू त्यांच्या कल्पना,
विचार विविध उपक्रमांतून प्रगट होण्यास सुरुवात झाली.
शिक्षकांनी
सिलॅबसप्रमाणे शिकवावे. कामाचे प्लॅनिंग करावे. वह्या व्यवस्थित तपासाव्यात. अध्यापनात नवीन प्रयोग करुन, विषय सुलभ करावा. ह्याबाबतीत त्यांचे धोरण काटेकोर होते.
त्याचबरोबर खेळ, क्रिडा, निरनिराळ्या कला, गायन, शिवण,
चित्रकला, हस्तकला यांच्या विकासाकडे त्यांचा कल
होता.
त्यांचा
आवाज अतिशय गोड होता. त्या धर्माने ख्रिश्चन होत्या. चर्चमधील गाणी सुरेल गात असत. ऐकत रहावसं वाटत असे. त्यांच्या
बोटात कला होती. टाकाऊ वस्तूतून टिकावू वस्तू तयार करण्याकडे
त्यांचा कल होता. सजावटीवर त्यांचा भर होता. आमच्या शाळेतील व्हरांड्यात काचेच्या शोकेस होत्या.
त्यात शिक्षकांनी मुलींकडून शैक्षणिक मॉडेल करुन घ्यावीत, ती शोकेसमध्ये लावावीत. तसेच ही Models सतत बदलत रहावीत, ही त्यांची अपेक्षा. ह्या स्वनिर्मितीतून विद्यार्थिनींमध्ये कलेची आवड निर्माण
होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडते.ऑफिसजवळच्या
मोठ्या शोकेसमध्ये शाळेला भेट मिळालेले एक दुमजली मोठे घर होते. ते घर सणाप्रमाणे सजवावे लागे. उदाहरणार्थ :- गुढीपाडव्याला घरावर तोरण, फुलांची माळ, साखरेच्या गांठी, छोट्याश्या साडीने सजलेली गुढी नव-वर्षाचे स्वागत करायची.
दिवाळीला आकाशदिवा, पणत्या, रांगोळ्या घरासमोर हजर व्हायच्या. ह्या घरातील ख्रिस्तमसही
थाटात सजायचा.
आमच्या
शाळेत वर्षानुवर्षे साजरे होत आलेले वर्गा-वर्गाचे श्रावणी शुक्रवारचे
हळदीकुंकू उत्साहात साजरे व्हायचे. आमच्या मोठ्याबाई स्वतः ख्रिश्चन
असूनही, पद्धतशीर हळदकुंकू लावून घ्यायच्या. शाळेच्या व्हरांड्यात प्रत्येक वर्गासमोर
असलेल्या फळ्यावर निरनिराळ्या प्रकारची माहिती लिहिण्याची
प्रथा होती. महिना पंधरा दिवसांनी ही माहिती बदलावी
लागे. मा. उजागरेबाईंनी ही प्रथा काटेकोरपणे चालू ठेवून
त्यात आणखीन भर घातली. प्रत्येक वर्गाने क्रमाक्रमाने गुलमोहर साप्ताहिक
चालविण्याचा उपक्रम सुरु झाला. गुलमोहरमध्ये माहिती अत्याधुनिक विषयानुरुप असली पाहिजे. तसेच ती आकर्षक व्हावी, म्हणून
गुलमोहर चित्रासह सजविण्यावर मोठ्याबाईंचा भर असे.
प्रत्येक वर्ग
स्वच्छ झाडलेला, बाकांची व्यवस्थित रचना, शिक्षकांची टेबल-खुर्ची योग्य ठिकाणी, फळ्यावर तारीख व सुविचार ह्या सर्व गोष्टी मोठ्याबाईंच्या शिस्तीत होणे अपरिहार्य
होते. वर्गाच्या भिंतीवर विषयानुरुप
घटकाप्रमाणे आकर्षक तक्ते हवेतच. ते दर महिन्याला
बदलले गेले पाहिजेतच, यावर त्यांचा कटाक्ष होता.
त्यांच्या
सेवाकाळात शाळेला ६०वर्षे पूर्ण झाली. शाळेतील हिरक महोत्सव दणक्यात
साजरा झाला. आजी-माजी शिक्षक व विद्यार्थिनींशी
संपर्क साधून, त्यांनी शाळेचा इतिहास ‘पाऊलखुण’
अंकाद्वारे प्रकाशित केला.
उजागरेबाईंच्या
व्यवस्थापनात प्रत्येक शिक्षकातील गुणांचा योग्य उपयोग करण्यावर भर होता. कलागुण असणाऱ्या शिक्षकांचा उपयोग समारंभ साजरा
करण्यासाठी त्या करीत असत. कांटेकोर शिस्तप्रिय शिक्षकांना बरोबर
घेऊन शाळाबाह्या परिक्षा (S.S.C.,H.S.C.,PSI,Banketc.)पार पाडल्या
जायच्या.
शाळेतील
रुढी- परंपरा उत्तरोतर वाढवित
नेत असताना, मोठ्याबाईंचा सेवानिवृत्तीचा दिवस उगवला.
शैक्षणिक विकासाचे निरनिराळे उपक्रम उजागरेबाईंना थांबवावे लागले. कालाय तस्मै नमः॥
प्रभा आठवले
माजी शिक्षिका,
ग. ग. हायस्कूल, नाशिक
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात. ह्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येतील.