मी बाई ‘बाई’ झाले !
नुकतेच नाशिकमध्ये ‘मराठा विद्या प्रसारक’तर्फे शिक्षणशास्त्र विद्यालय सुरु
झाले होते.मनाने एकच ध्यास घेतला B.Ed.व्हावयाचे.
सकाळचे कॉलेज, दुपारी Lessonsअशा
धावपळीत दिवस उगवायचा आणि संपायचा. विद्यार्थी
म्हणून अभ्यास- परिक्षा, विविध स्पर्धांमध्ये भाग तर घरी आल्यावर माता गृहिणी, कुटुंब- व्यवस्थापक अशा भुमिका पार
पाडताना; ‘जग ही रंगभूमी असून,
व्यक्ती ह्या रंगमंचावरील पात्रे आहेत’ ह्या वाक्याचे
प्रत्यंतर अनुभवयास मिळाले.
माझी B.Ed.ला इंग्लिश व मराठी मेथड होती. इंग्लिश शिकविणारे शिक्षक कमी म्हणून एक आशा होती. मी
B.Ed.ला मेथड म्हणून ‘इंग्लिश’ विषय घ्यावयास मागेपुढे पहात होते, कारण शिक्षणात बराच
खंड पडला होता. इंग्लिश ही परकीय भाषा. ‘व्याकरण’ हा भाषेचा मुख्य गाभा. शिक्षकीपेशाला ‘व्याकरणशुद्ध भाषा’ येणे आवश्यक, मग ती कोणतीही
भाषा असू दे. माझ्या मिस्टरांनी
मला सांगितले, “तुला B.Ed.होऊन नोकरी करावयाची
असेल तर तुला इंग्लिश हा विषय घ्यावाच लागेल, नाहीतर
B.Ed.होण्यात काही अर्थ नाही. फक्त मनाच्या समाधानासाठी
तू तुझ्या नावापुढे B.A.B.Ed.फक्त लिहू शकशील.”
मनाचा हिय्या केला व इंग्लिश भाषा मेथड म्हणून घेतली. दुसरा विषय सोपा म्हणून मातृभाषा मराठी घेतला. आमच्यावेळी
लेखी परिक्षा घेऊन, मेथडचे विषय देत असत. इंग्लिश, मराठी ह्या विषयांबरोबर ‘भूगोल’ ह्या विषयाची परिक्षा मी दिली. न जाणो इंग्लिशमध्ये आपण नापास झालो तर मनात धाकधुक होती. आश्चर्याचा धक्का म्हणजे मी तीनही विषयात
पास झाले. आता निर्णय घेणे माझ्या हातात
होते. मी इंग्लिश व मराठी हे दोन विषय निवडले.
आमच्याबरोबर एका शाळेचे मुख्याध्यापक होते. ते इंग्लिशमध्ये नापास झाले. इंग्रजी विषय घेणारे विद्यार्थी थोडे, त्यात परिक्षेत
पास होणारे अल्प ! अशा अल्पसंख्याकात मी पास होऊन समाविष्ट झाले.
‘ह्या बाई इंग्रजी विषयात पास कशा झाल्या?’ ह्याचे
त्या मुख्याध्यापकांना खूप आश्चर्य वाटायचे. शेवटी प्राचार्यांची विनवणी करुन, त्यांना ‘इंग्लिश’ विषय मिळाला.वर्षभर विद्यार्थी
जीवन enjoy करीत मी
B.Ed.ची परिक्षा पास झाले. मी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
होऊन, मी बेकारीच्या चक्रातून बाहेर
पडण्याचा प्रयत्न करायला लागले.
नोकरीसाठी अर्ज खरडणे सुरु झाले.
एक आशा मात्र निश्चित होती की, आपल्याला नोकरी
निश्चित मिळेल; पण ‘केव्हा? आणि कोठे?’ हा प्रश्न अधांतरी होता. प्रतिक्षा करण्यात १५ दिवस निघून गेले. आता मात्र मनांत शंका येऊ लागली, ‘आपण कुठेही वशिला लावू
शकत नाही. कारण ते मनाला पटत नव्हते. आपल्या
अर्जाला केराच्या टोपलीत स्थान!’ १५ दिवसांनी मुलाखतीच्या बोलाविण्याची
पत्रे येऊ लागली. तारखा निरनिराळ्या होत्या, म्हणून बरे.
आपल्या गुणपत्रिकांची फाईल घेऊन शाळांमध्ये जावे लागे. एका ठिकाणी फाईल पाहून, निवड समितीतल्या एकांनी विचारले,
“दिंडोरीला जायची तयारी आहे का? आता ऑर्डर हातात
देतो.” मी दिंडोरीला जाणे शक्य नव्हते. ‘नाही’ काही म्हटले नाही. हुकमी
एक्का हातात ठेवून सांगितले, “विचार करुन सांगते” आणि घरी परत आले.
२-३ ठिकाणी मुलाखतीला जाऊन आले. तिथे खूप उमेदवार होते, काही फर्स्ट क्लास M.A.,M.Com.,M.Sc.
माझे धाबे दणाणले ह्यातून आपला निभाव लागणे अशक्य. मुलाखती दिल्या पण वाट पहाणे सोडून दिले.
काही दिवस असेच गेले, मार्ग सापडेना !
जून महिना सुरु झाला. एके दिवशी ग. ग. हायस्कूल (नाशिक)चा शिपाई दुपारचा घरी आला आणि सांगायला लागला, “तुम्हाला
मोठ्याबाईंनी ताबडतोब बोलाविले आहे.” मी झटपट तयार झाले व शाळेच्या
आवारांत प्रवेश केला. ती भव्य दगडी इमारत, गर्द झाडीमध्ये कारंजा, त्यात मासे-कमळे पाहून मी भांबावले. मनांत विचार, ‘मोठ्याबाईंनी कशाला बोलाविले? नेमणूकीसाठी तर बोलाविले
नसेल ना?’
गोंधळलेल्या मनःस्थितीत
मी ऑफीसमध्ये प्रवेश केला. बेताची उंची, स्थूल बांधा, गोऱ्यापान, सुंदर, मोठ्या केशसंभारावर माळलेली फुले, हंसतमुख अशा बाईंनी माझे स्वागत केले. मला बसावयास सांगितले. त्या म्हणाल्या, “तुमच्या नेमणूकीची ४ शाळांमधून पत्रे निघालेली आहेत. आमच्या शाळेचे नेमणूकीचे पत्र तुम्हाला येईल.
आमची शाळा त्या शाळांपेक्षा उशीरा सुरु होईल तरी तुम्ही दुसऱ्या शाळेची
नेमणूक स्वीकारु नका. १५ जूनला आमची शाळा सुरु होते. बरोबर ११ वाजता हजर व्हा. नेमणूकपत्र उशीरा येईल.
काळजी करु नका. हजर झालेल्या दिवसांपासून तुमचा
सेवाकाल सुरु होईल.” हे ऐकून मी स्वप्नांत तर नाही ना!
असे मला क्षणभर वाटले. हवेत तरंगतच मी आनंदात घरी
केव्हा पोहोचले? ते मला समजले नाही.
दि. १५ जून १९७० ला मी ग. ग.
शाळेत शिक्षिका म्हणून हजर झाले. त्याकाळी इतर
शाळांमधील शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळत नव्हते. ग. ग. हायस्कूल सरकारी शाळा असल्याने, मला सेवानिवृत्ती वेतन मिळणार होते.
खऱ्या अर्थाने मी ‘बाई’ झाले. आत्तापर्यंत समाज मला ‘आठवलेबाई’
म्हणून ओळखत होता. कारण विवाहानंतर माझे आडनाव
‘आठवले’ झाले होते. मोलकरीण मला ‘बाई’ म्हणत असे किंवा
रस्त्यात कोणी अनोळखी व्यक्ति, “अहो बाई” म्हणून संबोधत असे.
ग ग हायस्कूल विद्यार्थिनींची ‘आमच्या बाई’ ह्या उपाधीने मी ‘आठवलेबाई’
म्हणून समाजात मान्यता पावले.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका - ग.
ग. हायस्कूल, नाशिक
क्रमशः