त्या दिवशी नेहमीप्रमाणे सायंकाळी ५:४० वाजता शाळा सुटली. आता
घरातली एक-एक कामे समोर दिसावयास लागली. लक्षात आले, घरात कोणतीच भाजी नाही. अगदी कांदे-बटाट्याची टोपली रिकामी झालेली होती.
मनाशी विचार केला, ‘भाजी आणावयास भद्रकाली मार्केटला जाऊं व नंतर घरी बसने जाऊं.’ आमच्या सौ. सरोदेबाई भद्रकाली मार्केटच्या भागात रहात होत्या. त्यांना मी म्हटले,”थांबा,
मीही आज तुमच्याबरोबर येते. मला भाजी घ्यावयाची आहे.”
आम्ही दोघी बोलत-बोलत भाजी मार्केटला आलो,
कोणती भाजी घ्यावी? कोणती भाजी ताजी आहे? हे पहात बाजारात
हिंडत होतो. सर्व भाजी विकणारे आपल्या आयुधांसह, भाज्या आकर्षक पद्धतीने लावून, रांगेने बसलेले होते. इतक्यात
एक भाजीवाली सरोदेबाईंकडे पाहून हसली व मोठ्याने
म्हणाली,”अग मुक्ते, तू इकडे कशी? माझी भाजी तर बघ, कशी ताजी आहे ते?” हे शब्द कानावर पडताच, आम्ही दोघी थबकलो. आम्ही त्या भाजीवालीकडून हवी ती,
भाजी खरेदी केली. त्या भाजीवालीचे अखंड बोलणे चालू होते व एकीकडे भाजी तोलण्याचे काम चालू होते. ती भाजीवाली म्हणाली, “मुक्ते, तू शिकलीस आणि मोठ्या शाळेत मास्तरीण झालीस.
आम्ही बघ ना, अश्या भाजी विकत बसलो आहोत.”
अर्थात त्या बोलण्याच्या पद्धतीत कोठेही द्वेष-मत्सर दिसत नव्हता. उलट सौ.सरोदेबाईंविषयी
कौतुकच जाणवत होते. सरोदेबाई म्हणाल्या,”अग, चालायचं. आज तुम्हीसुद्धा कामं
करुन, स्वावलंबी जीवन जगत आहात. जीवनात
श्रमाला महत्त्व आहे.” सरोदेबाईंनी मला सांगितले,” ह्या माझ्या बालमैत्रिणी आहेत. आम्ही एकत्र खेळलो,
एकत्र शिकलो”. आमच्या सरोदेबाईंना त्या बालमैत्रिणी
म्हणून ओळख करुन देताना, कोणताही कमीपणा वाटला नाही. केवढा हा मनाचा मोठेपणा !
भाजी खरेदी केल्यानंतर, चालता
-चालता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. त्या सांगू
लागल्या, “माझ्या आई - वडिलांना मी खूप
शिकाव, असे खूप वाटायचे. माझाही शिकण्याकडे
ओढा होता. अभ्यासात चांगली प्रगती
होती. मी मॅट्रिकची परीक्षा चांगल्या तऱ्हेने
उत्तीर्ण झाले. कॉलेजला जायची जबरदस्त इच्छा होती, पण आमच्या साळी समाजात बायका शिकत नव्हत्या. मुलींची
लहानपणी लग्ने होत. मी शिकावे, असे माझ्या
वडिलांना वाटत होते. पण त्यांनी मला काही अटी घातल्या;
‘पहिली अट नऊवारी साडी, केसाचा अंबाडा,
डोक्यावर पदर, हातभर बांगड्या. अशा पोशाखातच कॉलेजला जायचे. कॉलेज व घर यापलीकडे कुठेही
जायचे नाही’. शिक्षणाची प्रचंड ओढ असल्यामुळे, मी त्यांच्या सर्व अटी मान्य करुन, कॉलेजमध्ये प्रवेश केला.
कॉलेजमधील मुले मला पाहून, ‘काकूबाई आली-काकूबाई आली’
असे जोराने ओरडत असत. मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष
दिले नाही. माझी अभ्यासातील प्रगती पाहून,
हा विरोध आपोआप नाहीसा
झाला.”
सौ.
सरोदेबाईंचे नांव ‘मुक्ता’. नाव सुद्धा त्यांच्या रहाणीला शोभून दिसत असे. शिकत असताना त्या नटणे, मुरडणे, तऱ्हेतऱ्हेच्या साड्या नेसणे, स्वच्छंदी वागणे,
ह्या सर्व प्रलोभनांपासून मुक्त होत्या. नावातली सार्थकता, त्यांनी आपल्या रहाणीतून पटवून दिली.
सौ.सरोदेबाई गोऱ्यापान, नाकीडोळी नीटस, प्रकृती उत्तम, डोळसपणे जीवनाकडे पहाण्याची दृष्टी,
स्वभावाने शांत. राग कधी त्यांच्याकडे फिरकला नाही. आम्ही शिक्षिका गमतीने म्हणत असू, “सरोदेबाईंचे केस काळे
का आहेत? ह्याचे कारण त्या कधी रागावत नाहीत. अस्वस्थ होत नाहीत.”
एकदा त्यांच्या पर्समधून ८० रुपये रस्त्यात कुठे तरी पडले, ही गोष्ट त्यांनी हंसत सांगितली. ‘सुख-दुःखे समे कृत्वा, लाभालाभो जयाजयो।‘ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र.
त्या
संस्कृत व इंग्लिश हे विषय शिकवित असत. शिकविणे उत्तम पण विद्यार्थिनींवर
कधी रागवत नसत. मुलींनी खूप दंगा केल्यावरही, त्या कोणतीच
शिक्षा करीत नसत. फक्त “अग, दंगा करु नका”, एवढेच सांगत. त्यामुळे
मुलींचा त्यांच्यावर कोणताच राग नव्हता, पण बाल-स्वभावाप्रमाणे मुली हुडपणा करीत असत. बाई रागवत नाहीत, ह्याचीही
मुलींना गंमत वाटे.
एकदा त्यांच्याबरोबर २-३ दिवस रहाण्याचा
प्रसंग आला. तेव्हा मला त्यांची खरी ओळख झाली. पूर्वी ७वी पास झाल्यावर, व्ह. फा.(व्हर्न्याकुलर फायनल) परीक्षा
असावयाची. ती परीक्षा कंडक्ट करण्यासाठी, आम्हा शिक्षकांना खेड्यात जावे लागत असे. एका वर्षी सौ.
सरोदेबाई ‘वावी’ केंद्राच्या
प्रमुख व त्यांना सहाय्य करण्यासाठी असिस्टंट म्हणून मी व आमच्याबरोबर एक शिपाई असे;
आम्ही वावीला गेलो. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेचे
गठ्ठे घेऊन आम्हास जावे लागायचे. मोठे जबाबदारीचे काम असावयाचे.
खेड्यामध्ये रहाण्याची तशी सोय नसायची. एखाद्या
शाळेच्या वर्ग-खोलीत आम्ही उतरत असू .चहापाणी,
नास्ता त्याच शाळेतील एखाद्या शिक्षकाकडे व्हावयाचे. सकाळी जेवण एकाकडे व रात्रीचे जेवण दुसऱ्याकडे असे ३-४ दिवस रहावे लागे.
सौ.
सरोदेबाई पूर्ण शकाहारी होत्या. परीक्षा केंद्र
खेड्यात असल्याने, लोक आम्हाला खूष करण्यासाठी भाजीचा (मटणाचा) बेत करीत. त्या लोकांची
समजूत, ‘मी भटीण पण हल्ली
शहरातले भट लोक मांसाहार करतात.” सौ. सरोदेबाई साळी समाजाच्या,
त्यामुळे काही प्रश्नच नाही. पण आम्ही दोघीही शाकाहारी
आहोत, म्हटल्यावर त्यांचा हिरमोड होत असे.
रात्र झाली की, खेड्यातील एका पुढाऱ्याचा गट आम्हाला
भेटावयास यायचा. आम्ही परीक्षा कंडक्ट करणारे म्हणून आमचा मान
मोठा ! खेड्यातील राजकारणाची माहिती गप्पांमधून कळायची. जाताना आम्हाला तो गट सांगायचा, “बाई सांभाळून, दुसरा गट तुम्हाला
आता भेटावयास येईल” पहिला गट गेल्यावर, दुसरा
गट हजर. गप्पा सुरु.
मनात विचार यावयाचा, हे लोक इतकी जवळीक
का साधतात?
सौ. सरोदेबाई प्रमुख असल्यामुळे, त्याच बोलायच्या. मी फक्त श्रोत्याचे काम करत असे.
सौ. सरोदेबाईंचे शांत व संयमी बोलणे ऐकून,
त्या लोकांची परीक्षा प्रश्नपत्रिका वगैरे संबंधी माहिती काढण्याची हिंमत होत नव्हती. ‘माणसे न दुखवता, त्यांच्याशी
संवाद कसा साधावयाचा? व कोणतीही माहिती त्यांना द्यावयाची नाही’,
ही कला सौ सरोदेबाईंकडून शिकण्यासारखी होती.
सरकारी नियमाप्रमाणे सौ. सरोदेबाईंची ट्रेनिंग
कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल म्हणून बदली झाली आणि त्यांचा
सहवास संपला. अशा ह्या शांत-
विचारी व्यक्तिमत्वाने, आमच्या मनात कायमचा ठसा
उमटविला.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका
ग. ग. हायस्कूल, नाशिक