दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिन, आठवतात
ते दिवस मोठ्याबाईंच्या (कै.राजदेरकरबाईंच्या)
तालमीत तयार झालेला शिक्षक व विद्यार्थिनींचा ग. ग. पॅटर्न. त्याकाळी विविध शाळांचे मैदानी सामने
असोत, २६ जानेवारीला पोलीस परेड ग्राउंडची
तालीम असो किंवा गंगा-गोदा उत्सवाची हस्ताक्षर स्पर्धा असो, ग. ग. चा ग्रुप वेगळा
उठून दिसायचा. काही लोकांना आमच्या ग. ग.
पॅटर्नचे कौतुक होते तर काही नाशिककर अभ्यासाव्यतिरिक्त चाललेल्या ग. ग. शाळेवर टिका करायचे; कारण त्या काळांत ‘व्यक्तिमत्त्व विकास’ (Personality
Development) शब्दाचा वारा समाजाला लागलेला नव्हता.
मध्यंतरी
आमच्या ग. ग. हायस्कूलच्या प्रथम मुख्याध्यापिका कै. सुधा अत्रेबाईंचे ‘गोदातरंग’ हे आत्मचरित्र वाचनांत आले. १९४०साली ग. ग. पॅटर्न तयार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाले.
अत्रेबाई
ह्या पोटार्थी शिक्षिका नव्हत्या. शिक्षणाद्वारे समाजसुधारणा करण्याचे त्यांचे ध्येय होते. लहानपणापासून आपण काहीतरी करुन जगात नाव मिळविले पाहिजे, ही महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात होती.
दि १ जून
१९४० रोजी आदरणीय अत्रेबाईंनी आपल्या आजोबांना – कै. भाऊसाहेब तर्कखडकरांच्या पुण्यस्मृतीस वंदन करुन, ग.
ग.च्या शाळेत पहिले पाऊल टाकले. आपल्या आजोबांच्या शाळेत सुधाताईंना मुलींच्या
सरकारी हायस्कूलचा व मुलींचे सरकारी ट्रेनिंग कॉलेजचा नविन अध्याय सुरु करायचा होता.
ह्या इमारतीत पूर्वी भरणारे मुलांचे
हायस्कूल इंग्रज सरकारच्या धोरणानुसार बंद
होऊन, संपूर्ण इमारत
शाळा ट्रेनिंग कॉलेज व मुलींच्या हायस्कूलला दिलेली होती.
(राज्यकर्ते परकीय
असूनही त्यांनी ह्या वास्तुचा उपयोग सदैव शिक्षण-मंदिर म्हणून
केल्याची साक्ष इतिहास देतो).
मुलांच्या शाळेचे
अखेरचे मुख्याध्यापक नानासाहेब बर्वे यांनी अत्रेबाईंना
बंद झालेल्या मुलांच्या शाळेचा (श्री शिल्लक ४ आणे ३ पै) सहित चार्ज दिला. नानासाहेब अत्रेबाईंना म्हणाले, “तुम्ही भाऊसाहेबांची नात,
त्यांच्यासारखीच किर्ती इथे मिळवा.”
{ दि. २५ फेब्रुवारी १८८९
ते ३१ मार्च १८९९ ह्या कालावधीत भाऊसाहेब तर्खडकर
मुलांच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. त्यांनी लिहिलेल्या ‘तर्खडकर
भाषांतर’
पाठमालेचे महत्त्व २१व्या शतकातील शिक्षणतज्ज्ञ मानतात. भाऊसाहेब तर्खडकर हे नाशिकमधील शांत स्वभावाचे देवमाणूस होते.}
मुलींचे हायस्कूल
व ट्रेनिंग कॉलेजचा चार्ज देण्यास शाळेत कोणीच हजर नव्हते.
१९४०साली अत्रेबाईंना कार्यालयीन कामात श्री. गांगल सर व अनुभवी कारकून श्री टिल्लू ह्यांनी मदत केली. १९४०-४१ शैक्षणिक वर्ष ग ग हायस्कूल व ट्रेनिंग कॉलेज
ह्या दोन संस्थांची घडी बसविण्यात संपले असावे.
जून १९४१ ह्या दिवशी शाळेच्या घंटेने खऱ्या अर्थाने ग. ग. ची मुहुर्तमेढ केलेली दिसते. पहिले २-३ दिवस विद्यार्थिनी कल्ला करीत प्रार्थनेला
येत असत. अत्रेबाईंनी प्रत्येक वर्गाने रांगा करुन शांततेत सेन्ट्रल
हॉलमध्ये प्रार्थनेला येण्याची व परत वर्गात जाण्याची शिस्त शाळेत सुरु केली.
जगात घडणाऱ्या घडामोडींची ओळख मुलींनी बातमीपत्राद्वारे सांगण्याची प्रथा सुरु केली. रेडिओवर काही खास कार्यक्रम असेल तर तो त्यावेळी सेंट्रल हॉलमध्ये सर्व शाळेला ऐकविण्याचे काम राजदेरबाईंकडे होते.
सांस्कृतिक
कार्यक्रमातील राजदेरकरबाईंच्या योगदानाचा उल्लेख अत्रेबाईंनी केलेला आहे. चित्रकलेत विद्यार्थिनींना तरबेज करणारे चव्हाणसर, प्रेमळ
गायन शिक्षिका पलुस्करबाई, तसेच शिवण शिक्षिका, शास्त्राचे गांगल सर अशा सर्व शिक्षकांच्या सहाय्याने ग. ग. घडत होती. मुलींनी
केलेल्या शिवणकाम, हस्तकला प्रदर्शनातून ही सरकारी शाळा अतिरिक्त
खर्च भागवित होती.
दुसऱ्या महायुद्धाचा काळ असूनही परकिय इंग्रज सरकारने शाळेची आर्थिक जबाबदारी
सुयोग्य पार पाडली, असे दिसते.
१९४२ च्या ‘चलेचाव’ चळवळीने देश पेटून उठला होता. गावातील इतर शाळांचे विद्यार्थी स्वाभाविक इंग्रज सरकार संचलित ग. ग. शाळेवर मोर्चे आणीत, घोषणाबाजी होई. अत्रेबाई व त्यांचा स्टाफ शाळेच्या संरक्षणासाठी
धावून जाई. ह्या सर्व शिक्षकवृंदाला ‘चलेजाव’ चळवळीविषयी सहानुभूती होती, परंतु तत्कालिन तरुण पिढी ह्या सरकारी नोकरदारांची अडचण समजण्याच्या
मनःस्थितित नव्हती. पारतंत्र्यातील सुसंस्कृत तरुण पिढीतील
मुलांनी शाळेच्या आवारात कधीच प्रवेश केलेला दिसत नाही. निषेध करणाऱ्या मुली फक्त शाळेच्या
आवारात येत असत.
समाजाचा विरोध पत्करुनही ग. ग.चे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत होते. शाळेचे सर्व
वर्ग वरच्या मजल्यावर भरीत असे. खालच्या मजल्यावरील प्रयोगशाळेलगतच्या रिकाम्या वर्गात भूगोलाच्या सरांनी मॉडेल तक्ते वगैरे बनवून, अप्रतिम
भूगोल कक्ष तयार केलेला होता. कोणीतरी विघ्नसंतोषी माणसाने अॅसिडची
बाटली ह्या भूगोलाच्या वर्गात ठेवली. अॅसिडच्या
वाफांचा वास ‘कै. केरु लोखंडे’ ह्यांना आला. प्रसंगावधान राखून त्यांनी ती बाटली खोली बाहेर
काढली, अनर्थ टळला.
{ हे ‘केरु लोखंडे’ म्हणजे आपल्या भूगोल शिक्षिका
कै. सीता लोखंडेबाईंचे वडील व आपले लोखंडे आजोबा - लॅब असिस्टंट होत.आम्ही शाळेत विद्यार्थिनी
असताना, फक्त एकट्या मोठ्याबाई (कै.
राजदेरकरबाई) लोखंडे आजोबांना ‘केरु’ म्हणून हाक मारत असल्याचे मला आठवते. }
स्वामी
विवेकानंद (इंग्रजी माध्यम) शाळेच्या जनक सीताबाई लेले इंग्रजी शिकविण्यासाठी ग. ग.ला लाभल्या. लेलेबाईंनी स्वलिखित ‘स्लिपिंग ब्युटी’ इंग्रजी नाटक बसविले होते. ह्या नाटकात
प्रसिद्ध लेखिका शिरीषताई पै (अत्रे) व नाशिक लाडके नेतृत्त्व माजी मंत्री पुष्पाताई हिरे (कदम) ह्यांनी प्रमुख भूमिका (शिरीषताई -
राजपुत्र, पुष्पाताई –
राजकन्या) केल्या होत्या.
सयाजीराव गायकवाडांचा वैभवी दसरा महोत्सव
पहाण्यासाठी ग. ग.ची सहल बडोद्याला गेली होती. सहलीत बडोदा संस्थानातील
बाग पहाताना, गजराजाने गळ्यात फुलांचा हार घालून ‘अत्रेबाई’ ह्या शिक्षिकेला मानवंदना दिली होती.
परसातील बागकामापासून ते शालेय विषयांपर्यंत विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा अत्रेबाईंनी सुरु केलेला ‘वसा’ पुढील शिक्षकांच्या पिढ्यांनी जोपासला,
वाढवला.
समस्त शिक्षकवृंदास शतशः प्रणाम।
अनुराधा आठवले (घाणेकर)
माजी विद्यार्थिनी,
ग. ग. हायस्कूल, नाशिक

![]() |
ग. ग. हायस्कूल (इसवी सन १९४०) |