Saturday, June 10, 2017

माझी कर्मभूमी - शासकीय माध्यमिक कन्या शाळा, नाशिक

        ते १९६० सालच्या मे महिन्याचे सरते दिवस होते. मी व माझी बहिण सुट्टीत नाशिकला गेलो होतो. संध्याकाळी आग्रा रोडवर फिरायला चाललो होतो. त्यावेळी आग्रा रोडच्या दुतर्फा गर्द सावलीची विशाल अशी वडाची झाडे होती. थोडेसे पुढे गेलो तर सुरेख अशी काळ्याभोर दगडांची मोठी अशी दुमजली इमारत दिसली. त्या इमारती भोवती दाट हिरवी झाडी होती. त्यापैकी एका झाडावर पाटी होती शासकीय माध्यमिक शाळा. ती भव्य सुंदर इमारत पाहून अस वाटल की अशा इमारतीमध्ये काम करायला मिळाले तर काय छान होईल! त्यावेळी  मी अकोल्याला [विदर्भ] येथे राहात होते व तेथील नॉर्मल स्कूल- (हल्लीचे डीएड कॉलेज) मध्ये शिक्षिका होते.
        योगयोगाच्या गोष्टी अशा की फेब्रुवारी १९६१ मध्ये लग्न होऊन आम्ही नाशिकमध्ये स्थायिक झालो. आक्टोबर १९६१ मध्ये माझी नाशिकच्या शासकीय कन्या शाळेतच बदली झाली. त्या सुंदर इमारतीमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न प्रत्यक्षात आले. माझ्या माहितीप्रमाणे १९६०-६१ पासून शा. मा. कन्याशाळा ही नाशिकमधील नामवंत शाळांपैकी एक म्हणून गणली जात होती.
        ह्या इमारतीमध्ये प्रथम Boys  हायस्कूल होते व मुलींची शाळा म. गांधीरोड वरील एका घरात रत होती. नंतर पेठे, रुंगठा, न्यू हायस्कूल अशा ४-५ शाळा निघाल्या व मुलींची शाळा ह्या इमारतीमध्ये रू लागली. नाशिकमधील चांगल्या चांगल्या लोकांना आपली मुलगी ह्याच शाळेत घालावी असे वाटत होते. पण प्रथम प्रवेश परीक्षा घेतली जाई. मराठी व गणित ह्या विषयांची. त्यातील गुणानुक्रमे पहिल्या ३० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाई. प्रत्येक वर्गात फक्त ३० मुली असत विशेष म्हणजे ५ वी ते १० वी सर्व वर्गाना शिकवायला प्रशिक्षित पदवीर शिक्षिका असत. शाळेचे आणखी एक  वैशिष्ट असे होते की एकदा ११ वाजता मुलगी शाळेत  आली की, ५ वाजेस्तोवर [अपवादत्मक परिस्थितीनुसार] शाळेच्या बाहेर पडायची परवानगी नसे. त्यामुळे  पालकांना मुलींच्या सुरक्षिततेची काळ्जी नसे.
        माझ्याकडे शाळेचे नवीन प्रवेश केलेल्या मुलींचे दाखले नोंदविण्याचे [जनरल रजिस्टर] जबाबदारीचे काम होते. एकदा ते लिहितांना सहज मागील पाने चाळता-चाळता मला स्वातंत्र्यवीर मा. वि. दा. सावरकर ह्यांच्या नावाची नोंद आढळली. आम्हा सर्वांना मा. सावरकर ह्या शाळेत शिकून गेल्यांचा खूप अभिमान व आनंद झाला. सर्वांना तो अविस्मरणीय अशा आनंदाचा क्षण वाटला.
        ह्या शाळेचे प्रमुखपद माझ्या माहितीप्रमाणे श्रीमती डेंगळे, सुधाताई अत्रे, रोहिणीताई भाटे, श्रीमती परभाणे, श्रीमती राजदेरकर ह्यांच्या सारख्या बहुश्रूत व कर्तृत्ववान अधिकार्‍यांनी भुषविले. सर्व  मुलींच्या अंगी असलेल्या विविध गुणांचा विकास होईल अशा activities योजण्याचे त्या सर्वांनी आपआपल्यापरीने खुप प्रयत्न केले.
        सकाळी  प्रार्थनेच्या वेळी त्यादिवशी ज्या मुलीचा वाढदिवस असेल तिला समोर बोलावून गुलाबाचे फूल देऊन तिचे अभिनंदन केले जाई, तसेच श्रीमती त्रिवेदी व सौ. पलुस्कर सर्व मुलींना निरनिराळी राष्ट्रीय गीते, समूह्गीते शिकवीत असत. शाळेचा संगीत विभाग ह्या दोघींनी समृद्ध केला. स्व. वि. दा. सावरकर ह्यांचे स्वतंत्र ते गवती हे गीत ६०० मुली एका सुरातालात गायच्या तेव्हा तर आम्हा सर्व शिक्षकांचा ऊर अभिमानाने रुन यायचा. शाळेच्या स्नेहसंमेलनात पुष्कळ वेळा सर्व ६०० मुलींना स्टेजवर येण्याची संधी दिली जात असे. संमेलनाला मा. कुसुम्रागज, मा. मधुकरराव चौरी ह्यांच्या सारख्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांकडून सर्वांना मार्गदर्शन मिळत असे.
        शाळेच्या तपासणी (inspection) साठी Miss Boys, श्रीमती प्रकाश अशा अतिशय अभ्यासू पण कडक शिस्तीच्या तपासनीस अधिकारी येत असत. त्यांच्याकडून शाळेला उत्तम शेरा मिळत असे. तपासणीनंतर सर्व मुलींची सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत असत. Miss Boys ह्यांनी तर शाळेच्या मैदानावरील चिंचेच्या झाडाखाली मुलींना बसवून त्यांना झाडे, फुले, फळे, पक्षी ह्यांच्याबद्दल interesting माहिती सांगून खूष केले.
        शाळेच्या माजी विद्यार्थिनी आज नामवंत डॉक्टर ,खेळाडू, वकील, आमदार, लेखिका architect म्हणून आपआपल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. शाळेची माजी विद्यार्थिनी सुनंदा कुलकर्णी म्हणजे सानिया, तसेच सुलक्षणा ओक-महाजन ही अत्यंत कुशल अशी architect म्हणून प्रसिद्ध आहे. अशा आणखी कितीतरी माजी विद्यार्थिनी शाळेला अभिमानास्पद कार्य करीत आहेत. त्यांचे श्रेय मी शाळेत चालत होत्या, त्या अभ्यासास पूरक अशा अनेक कार्यक्रमांना देईन.

        शाळेची आठवण आली की मनात असंख्य विचार व भावना उचंबळून येतात, आमच्या विद्यार्थिनींकडून आम्हा शिक्षकांनाही बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या व आमचीही जीवने समृध्द झाली.
श्रीमती वसुमति देशपांडे (चित्रे)
माजी शिक्षिका, . . हायस्कूल,
नाशिक