स्पर्धात्मक जीवनाची पायाभरणी करणारा शालेय आयुष्यातील ‘१ मे’
हा दिवस. सेंट्रल हॉलमध्ये प्रत्येक वर्गाचा वार्षिक
परिक्षेचा निकाल मोठ्याबाई (सौ. आशाताई राजदेरकर) जाहीर करायच्या. प्रगतीपुस्तकातील नंबरातून, प्रत्येक विषयातील मार्कांमधून आपले अभ्यासातील स्थान कळायचे. अर्थात पहिल्या -
दुसऱ्या क्रमांकांचा आनंद अवर्णनीय असायचा. १ मे
नंतर लगेच सुरु होणारी उन्हाळ्याची सुट्टी ह्या ‘यशस्वी विद्यार्थिनींना’ जशी हरभऱ्याच्या झाडावर चढू द्यायची नाही, तसेच कमी मार्कस् मिळविणाऱ्या किंवा नापास विद्यार्थ्यांना निराशेच्या दरीत
जाऊ द्यायची नाही. मस्त खेळायला देणारी ही ‘उन्हाळ्याची सुट्टी’ आमच्या पिढीचे ‘बालमानसशास्त्र’ जपायची.
१मेच्या
दिवशी पेढ्याच्या दुकानात पालकांची गर्दी व्हायची. बाकी नाशिक
शांत असायचे. हल्ली सारखे कामगार – मोर्चे,
सभा, घोषणा त्याकाळी नव्हत्या. आम्ही ‘कामगार’ हा शब्दही ऐकल्याचे आठवत नाही. शाळेत काम करणाऱ्या लोकांना ‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी’
(कर्माचे आचरण करणारे) असे म्हणायचे.
उन्हाळ्याची
सुट्टी सुरु व्हायची वार्षिक निकालानंतर शाळेच्या
घंटेने ! इयत्ता ५वी - ६वी असताना ‘दत्तुमामा’ वाजवित
असलेल्या ह्या घंटेचे खूप आकर्षण होते. खेळायचा ९वा तास संपताना,
आम्ही मुली आपापली दप्तरे घेऊन सेंट्रल हॉल समोरील पितळी घंटेभोवती जमा होत असू. ‘दत्तुमामा’ प्रत्येकीला आळीपाळीने घंटा वाजवायला द्यायचा,
खूप मजा यायची.
शाळेतील शिक्षकेतर
स्टाफ आमच्या विद्यार्थी जीवनांत समरस झालेला होता.
‘दत्तु, सोनवणे, पवार’
हे आमचे मामा लोक, ट्रिपच्या वेळी एखाद्या शिक्षकासारखे
मुलींना सैरावैरा पळू द्यायचे नाहीत. इयत्ता
पाचवीत असताना अजिंठा-वेरुळच्या सहलीहून
परत आल्यावर, दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी मला ताप चढायला
लागला, कसतरी होत होते. मोठ्याबाईंचे (आदरणीय राजदेरकरबाई) प्रत्येक विद्यार्थिनीवर बारीक लक्ष असावे. प्रार्थना संपल्यावर
ओळीने वर्गात जात असताना, त्यांनी मला थांबवून अंगाला हात लावून
पाहिला. ताबडतोब दत्तु शिपायाला बोलावून, मला घरी पोहोचवायला सांगितले. माझे दप्तर स्वतः घेऊन
दत्तुमामाने मला घरी पोहोचविले. “पोरीला ताप आलाय. ताप उतरेपर्यंत २-४ दिवस तिला शाळेत पाठवू नका”,
असे दत्तुमामा माझ्या आत्याला म्हणाला.
शाळेतील
प्रत्येक विद्यार्थिनीची काळजी घेणाऱ्या ह्या स्टाफमधील प्रेमिलामावशीचे ‘स्वच्छता-अभियान’ ग. ग. कधीही विसरु शकणार नाही. गुजराथी पद्धतीची साडी नेसणारी ‘प्रेमिलामावशी’
रोज व्हरांड्यातील सगळे माठ, पिप घासून लख्ख केल्यावरच पाण्याने भरायची. कोणत्याही मुलीने पेला पाण्यात बुडविलेला तिला चालायचा
नाही. शिस्तीत ओगराळ्यानेच पाणी पेल्यात ओतून घ्यावे लागायचे. आमचे वर्ग झाडणाऱ्या ‘जाधवबाई व त्यांचे सहकारी’ आमच्या विसरलेल्या वस्तु, डबा, पुस्तके, पेन वगैरे ऑफिसमध्ये नेऊन द्यायचे.
प्रयोगशाळेचे काम सांभाळणारे लोखंडेआजोबा सेवानिवृत्त
झाल्यावर, पोरसवदा ‘खाडेदादा’ त्यांच्या जागेवर आला. स्वतःची पर्सनॅलिटी जपणारा ‘खाडेदादा’ प्रयोगशाळेत, प्रयोगाच्या वस्तु व्यवस्थित काढून ठेवायचा.
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ‘चिटणीससर, शिंदेभाऊसाहेब, धारणकर बाई, सय्यदभाऊसाहेब’ ह्या लोकांशी आमचा कधी संबंध आला नाही. त्यांना आम्ही ऑफिसमध्ये काम करताना पहायचो. एका गोष्टीचे आजही नवल वाटते, ही ऑफिस स्टाफमधील मंडळी एवढ्या १००० मुलींमधील प्रत्येकीला नावानिशी कशी ओळखत होती ?
आमच्या शाळेचे वैभव असलेली शाळेभोवती बाग जोपासायचे माळीबाबा (लगरे). शाळेतील प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थिनी
व शिक्षकांचे वाढदिवस चाफ्याचे फूल देऊन साजरे व्हायचे. वर्षभर आम्हाला फूल पुरविण्याचे
काम माळीबाबा व त्यांची बाग करीत होती.
‘१ मे’
ह्या दिवसाच्या प्रार्थनेच्या वेळी मोठ्याबाई (कै. राजदेरकर बाई) महाराष्ट्र दिनाची
माहिती सांगायच्या, पण आमचे सगळे लक्ष रिझल्टकडे असायचे.
शाळेच्या सेंट्रलहॉलमधील महाराष्ट्राचे नकाशे आम्हाला वर्षभर महाराष्ट्राचे नद्या, डोंगर, खनिज, पिके,
कारखाने, रेल्वे लाईन, पावसाचे
प्रमाण, हवामान इत्यादी भौगोलिक ज्ञान द्यायचे. हे नकाशे आमच्या वर्गातील ‘किशोरी बक्षी,
नसीम रंगवाला’ ह्या चित्रकार मैत्रिणींबरोबर सेंट्रलहॉलमध्ये आम्ही रंगवत असू. तक्त्यांवर नकाशे रंगवताना, भूगोल विषय शिक्षिका केंगेबाई, पुंडलिकबाई,
लोखंडेबाई; चित्रकला शिक्षक देवळेसर, पाठकबाई (शालिनी
कुलकर्णीबाई) तसेच शाळेतील इतर शिक्षिका ऑफ पिरियडला येऊन आम्हाला मार्गदर्शन करीत असत.
स्वहस्ते महाराष्ट्राच्या
नकाशांनी आम्ही सजविलेला ‘ग. ग.चा सेंट्रल हॉल’ आजही आठवून अभिमानाने म्हणावेसे वाटते,
‘जय महाराष्ट्र’
अनुराधा आठवले (घाणेकर)
माजी विद्यार्थिनी, ग. ग. हायस्कूल
नाशिक