मी जयश्री
बळवंत जगताप, पूर्वाश्रमीची जयश्री गंगाधर शिंदे. माझ्या शालेय जीवनाची
सुरवात १९४७ मध्ये झाली. त्यावेळी
माझे वडील मामलेदार ऑफिसमध्ये असल्याने, त्यांच्या वारंवार बदल्या
होत असत. त्यामुळे माझे प्राथमिक
शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
माझे ५वी
ते ७वी चे शिक्षण महानगर पालिका शाळा क्रमांक २, नाशिक येथे झाले.
इसवी सन १९५५ मध्ये व्हर्नाक्युलर फायनल ही ७ वीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर Govt. Girls’ Highschool मध्ये मी इयत्ता ८वी प्रवेश घेतला.
नगरपालिकेच्या
शाळेतून ग. ग. मध्ये प्रवेश ही अतिशय आनंदाची बाब होती. मोठी दगडी भव्य इमारत, सभोवतालीचा परिसर, मोठी झाडे बाग याचे मला खूपच आकर्षण वाटले.
आमचे ८वी ते ११वीचे वर्ग पहिल्या मजल्यावर होत. वर्गातील मुलींची संख्या ३०-३५ एवढीच होती. पुष्पा पाटणकर, आशा देवळालीकर, प्रतिभा पाटणकर, प्रतिभा धोपावकर, शांता सुंठवाल,
सुहास कर्णिक, प्रभा फडणीस, माणिक आकुत, लता पटेल इत्यादी
वर्गमैत्रिणी होत्या.
आमच्या वेळी मुख्याध्यापिका
‘श्रीमती झायवालामॅडम’ होत्या. त्यानंतर
‘मिसेस विनोदमॅडम’ आल्या. दोघीही मुख्याध्यापिका अत्यंत हुशार व कडक शिस्तप्रिय होत्या. त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती वाटे.
इयत्ता ८वीच्या
वर्गशिक्षिका श्रीमती पाटणकर बाई होत्या. त्या आम्हाला ‘बीजगणित’ शिकवीत असत. मला ‘बीजगणित’ हा विषय नवीनच असल्याने लवकर समजत नसे.
परंतु त्यांनी चांगले शिकविल्याने व माझे अंकगणित व भूमिती विषय चांगले असल्याने अडचण होत नसे. इंग्लिश विषयाला श्रीमती इंगळे बाई होत्या.
त्याही इंग्लीश अतिशय सुंदर शिकवित. संस्कृत विषय
श्रीमती काशिकर बाई तर हिंदी विषय ओढेकर बाई शिकवीत. त्यांचे
या विषयांवर चांगले प्रभुत्व होते.
मला गायन
हा विषय शिकायला आवडे.
आईच्या इच्छेने मी शिवण घ्यावे असे सांगितले. मला शिवण आवडत नसल्याने मी ‘ड्रॉईंग’ हा विषय घेतला होता, परंतु
त्याच वर्षी ‘होमसायन्स’ हा विषय नव्याने
सुरु झाल्याने मी ‘होमसायन्स’ हा विषय निवडला.
त्याच वर्षी ह्या विषयासाठी शाळेत भरपूर साहित्य आले. हा विषय श्रीमती
देशपांडेबाई शिकवित. त्यात ‘बागकाम’
असे. आम्हाला सर्वांना वाफे देऊन भाजी लावायला दिली होती.
याची एक आठवण अजून आहे, ती म्हणजे
------
मी माझ्या
वाफ्यात मेथीची भाजी व मोरपंखी रिफ (शोभेची वनस्पती) लावली होती. ‘होमसायन्स’ विषय शिकण्यासाठी
बाहेरील शाळेतूनही विद्यार्थिनी येत असत. त्यांनी माझा तयार झालेला
वाफा, चांगली वाढलेली भाजी व शोभेची मोरपंखी उध्वस्त केली. त्यामुळे मी तक्रार घेऊन बाईंकडे गेले. ‘मी चांगला वाफा
तयार केला होता पण मला मार्कस् मिळणार नाहीत’ असे मला वाटले.
परंतु देशपांडे बाईंनी माझी समजून घातली. त्या
मला म्हणाल्या, “वाईट वाटून घेऊ नकोस. मी
तुझा वाफा पाहिला होता. मी तुला त्याचे पूर्ण मार्कस् देईन.
तू घेतलेली मेहनत मी पाहिली आहे.”
ग.
ग. चा सेंट्रल हॉल अप्रतिम आहे. याचा आम्हा सगळ्या मुलींना अभिमान वाटे. सेंट्रल हॉलमध्ये प्रार्थना, बातम्या वाचून दाखविणे ह्या गोष्टी होत असत,
काही शोज दाखविले जात.
शाळेच्या
आवारातील हौद, जाईच्या मांडवाखाली डबे खाणे, ह्या गोष्टी फक्त ग.ग.मध्येच होत्या. चिंचेच्या झाडाखाली चिंचा गोळा करुन खाणे, चंदनचारोळ्या
खाणे, हिरव्या चाफ्याची फुले ह्या सगळ्यांची खूप खूप मजा वाटे.
शाळा हवीहवीशी वाटे. इयत्ता १०वीत वडिलांची बदली
झाल्याने, ग. ग. सोडावी
लागली पण शाळा सोडताना खूप वाईट वाटले.
‘माझी शाळा म्हणावी’ अशी ही शाळा असल्याने, माझ्या धाकट्या बहिणीने (यशश्रीने) ह्याच शाळेत प्रवेश घ्यावा, ह्यासाठी मी आग्रही होते.
तसे पाहिले तर एन. ई. आय.
हायस्कूल, शारदा मंदीर (सारडा
कन्या विद्यालय) ह्या शाळा घराच्या जवळ असूनसुद्धा, लांब असलेल्या ग. ग. शाळेत यशश्रीची
अॅडमिशन घेतली.
विशेष
म्हणजे माझे वडील ‘कै. गंगाधर नानाजी शिंदे’
हे देखील ह्याच शाळेचे विद्यार्थी. पूर्णतः मुलींची
ग. ग. हायस्कूल होण्यापूर्वी ही शाळा मुलांची
होती.
अशी ही ग. ग. शाळा अतिशय अभिमानास्पद आहे.
---- जयश्री बळवंत जगताप
माजी विद्यार्थिनी, ग, ग, हायस्कूल नाशिक