कै. गवळीसर (माजी
गायनशिक्षक- ग. ग. हायस्कूल, नाशिक)
वेळ दुपारची होती. मला ‘ऑफ पिरियड’ होता. मी वह्या तपासत
होते. इतक्यांत गवळीसरांचे आगमन झाले. टेबलाजवळच्या
खुर्चीत बसत ते म्हणाले, “बाई, तुम्हाला
मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला रिटायर व्हावयास खूप
अवकाश आहे, तरी प्रॉव्हिडंट फंडातून मधून मधून कर्ज काढा आणि पैसे काढून
घ्या, कारणं काही द्या, नाहीतर माझ्यासारखी परिस्थिती होईल.” या वाक्याचा मला
काहीच बोध होईना. मी म्हणाले, “का हो सर, असं का म्हणता? काय झाले?”
ते चेहरा पाडून बसले होते. ते मला म्हणाले,
“बाई तुम्हाला तर माहिती मी ४ महिन्यापुर्वी सेवानिवृत्त झालो.
पण मला अजून कोणतेच पैसे मिळाले नाहीत. पगार बंद
झाला. मी जगावं कसं?” त्यांचे बोलणे ऐकून
मला एकदम चर्र झाले. शासनाच्या काही अडचणी असतील किंवा सरांची
आवश्यक कागदपत्रे पूर्ण झालेली नसतील. कारण मला माहित नाही पण
घडले मात्र असे!
गवळीसर निर्वासित म्हणून भारतात आले, असे मी ऐकले होते.
खरे खोटे मला माहित नाही. वर्ण काळा, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा, मध्यम बांधा पण पोशाख म्हणजे पांढरा
शुभ्र शर्ट व पायजमा अशी व्यक्ती सेंट्रल हॉलमध्ये पायपेटीवर बसलेली असायची.त्यातून वेगवेगळे सूर काढण्याचा उद्योग. मी नुकतीच शाळेत कामावर रुजू झाले होते. त्या काळात गायनाची विविध वाद्यांवर विद्यार्थिनी
सराव करताना, गायनाच्या हॉलमध्ये तसेच सेंट्रल हॉलमध्ये
दिसायच्या. सर गायक होते तसेच उत्तम वादक असावेत. प्रार्थना सेंट्रलहॉमध्ये व्हावयाची. विविध वाद्यांचा उपयोग करुन
तालासुरांत व्हावयाची, तीही गवळीसरांच्या देखरेखीखाली.
गवळीसर स्वतःची जात हिंदू-ख्रिश्चन सांगावयाचे.
ते जन्मतः हिंदू असावेत व परिस्थितीनुसार ख्रिश्चन झाले असावेत.
हिंदूंचे संस्कार ते विसरलेले नव्हते.
इथे एक गोष्ट नमुद करायची म्हणजे गवळीसरांच्या कोणत्यातरी नातेवाईकाची बातमी
पेपरला आली होती. ह्या नातेवाईकाने मुलींच्या बाबतीत काही भानगड
केली, अशी गोष्ट पेपरमधील बातमीने जगजाहीर झाली. गवळीसरांचा नातेवाईक म्हणून समाज गवळीसरांचा संशय घेऊ लागला.त्यातून आमची ग. ग. म्हणजे मुलींची
शाळा. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘ताडीच्या
झाडाखाली उभे राहिले की समाज त्या व्यक्तीकडे निराळ्या दॄष्टीने पहातो.’ मला नेहमी वाटायचे, हा गवळीसरांवर अन्याय
होत आहे. गवळीसरांच्या नातेवाईकाने काही गैर कृत्य केले असेल
तर त्यात गवळीसरांचा काय दोष? स्वतःची जात अभिमानाने हिंदू-ख्रिश्चन सांगणाऱ्या गवळीसरांनी, न बोलता
स्वतःच्या वागणूकीतून, ‘शिक्षक-विद्यार्थिनी
हे पवित्र नाते’ समाजाला दाखवून दिले. समाजाचा
दॄष्टीकोन आपोआप बदलला.
श्रीमती प्रभा आठवले
माजी शिक्षिका, ग. ग. हायस्कूल नाशिक