G.G.H.S.Nashik Blog उद्देश्य :-
आमची ग. ग. हायस्कूल
नाशिक, ही शाळा श्रीमद् भगवद् गीतेतील अध्याय १५, पेटीच्या सुरांत सामुहिक गायनाने
सुरु होत असे. श्रीमद भगवद् गीतेतील अध्याय १५ मधील पहिल्या श्लोकांत विश्वाचे वर्णन
करताना, भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
श्री भगवान उवाच।
ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वथम् प्राहुः
अव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यः तम् वेद सः वेदवित्॥ १५ – १ ॥
{ अर्थ :-
श्री भगवान म्हणाले, “सर्व छंद ही ज्याची पाने आहेत. त्या अश्वथ (पिंपळ) वृक्षाचे मूळ
वर आहे आणि खाली शाखा पसरलेल्या आहेत. त्याला अविनाशी म्हणतात. जो हे जाणतो, त्यालाच
वेदांचा जाणकार असे म्हणतात.”}
‘ग. ग. हायस्कूल, नाशिक’
ह्या आमच्या शालेय जीवनातील वृक्षाचे रोपण ‘ए. व्ही. (Anglo- Vernacular) स्कूल’ -
मुलींच्या शाळेच्या रुपांत फेब्रुवारी १९२१ साली साठ्ये वाड्यात झाले. ह्या रोपाची जोपासना करण्यासाठी हुजुरपागा, पुणे येथील
अनुभवी शिक्षिका व मुख्याध्यापिका यांची बदली नाशिकला होत असे. आदरणीय पुतळाबाई पवार
ह्या पहिल्या मुख्याध्यापिकेने, हे छोटेसे रोपटे नाशिकच्या तीर्थक्षेत्री लावले. अशाप्रकारे
ग. ग. हायस्कूलचे मुख्य मूळ हुजुरपागा, पुणे
ही शाळा आहे.
काळाच्या ओघांत ह्या रोपट्याचे
१९४०साली प्रशस्त दगडी इमारतीत स्थलांतर झाले. सन १९४० साली मुलींच्या शाळेने ‘गव्हर्न्मेंट गर्ल्स हायस्कूल’ नाव धारण
केले.
ग. ग. हायस्कूल, नाशिक शाळेच्या प्रशस्त
दगडी इमारतीचे अनावरण दि. १६ जुलै १९१९ रोजी
त्या वेळेचे शाळाखात्याचे मुख्य मेहेरबान जे. जी. कॉव्हर्न्टन् यांच्या
हस्ते मोठ्या थाटात झाले. ह्या समारंभाला आणखीही
काही युरोपियन अधिकारी आणि इतर सद् गृहस्थ उपस्थित होते.
नजिकच्या भविष्यकाळात, अजुन ३ वर्षांनी दि. १६ जुलै २०१९ रोजी
ह्या वास्तूच्या शैक्षणिक योगदानाची शंभर वर्ष पूर्ण होतील.
ग. ग. हायस्कूल - वास्तुपुरुषाच्या
आशीर्वादाने तसेच सर्व गुरुजनांच्या अथक प्रयत्नांतून हा शैक्षणिक वृक्ष विस्तारत गेला.
ह्या वृक्षाच्या छायेत शिकलेल्या अनेक विद्यार्थिनी जगभर ‘ग. ग.च्या मुली’ असा आपला
ठसा उमटविताना दिसतात.
G.G.H.S.Nashik
ह्या ब्लॉगद्वारे लौकिक अर्थाने असलेल्या हुजुरपागा
(पुणे) शाळेच्या नाती व ग. ग. हायस्कूल (नाशिक)च्या आम्ही मुली(विद्यार्थिनी), एकत्रितपणे आमच्या (G.G.H.S.,Nashik)
शाळेचा इतिहास, आमच्या भूतकाळातील शालेय आठवणी, आमचे शिक्षक, आमच्या शाळेतील विविध उपक्रम तसेच वर्तमानकाळातील आमचे वैयक्तिक यश यांचे संकलन आपल्या सर्वांच्या सहकार्याने करीत आहोत.
॥जय श्रीगुरुदेव दत्त॥