Friday, August 19, 2016

ग. ग. च्या मुली

बहरली जिथे हिरवळीत कोमल फुले।
मी फुलपाखरु झुले तिथे चिमुकले॥
अशा सार्थ शब्दात माजी मुख्याध्यापिका-मा. सरिता उजागरेबाईंनी शाळेतील शिक्षक - विद्यार्थिनी भावविश्वाचे ‘आमची वाटचाल’ हा ग. ग. चा इतिहास सांगताना, वर्णन केलेले आहे.
ग. ग. शाळेतील काही ज्ञात विद्यार्थिनींच्या नावाची कुसुमावली :-
माजी मुख्याध्यापिका - ग. ग. हायस्कूल, नाशिक
सौ. आशा राजदेरकर (कु. तारा गोरवाडकर), श्रीमती सुलोचना परभाणे

मुख्याध्यापिका
सौ. कुसुम पटवर्धन, सौ. कुसुम सातपुते, सौ. वडनगरे, सौ. लेले

अध्यापिका- ग. ग. हायस्कूल
सौ. विद्या केळकर (कु. कुसुम खरे), सौ. नलिनी लिमये (कु. यमुना जोशी)

समाजकार्य
सौ. अनुताई लिमये (कु. अनु भागवत) - प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्त्यी
शोभना रानडे (दुर्गा दांडेकर) प्रसिद्ध समाज कार्यकर्ती – Gandhi National Memorial Trust Agakhan Palace –कार्यकारी मंडळ चिटणीस व सभासद, समाज कल्याण बोर्ड सभासद.
विमल भट

सौ. सुधाताई अत्रे (माजी मुख्याध्यापिका -ग. ग. हायस्कूल, नाशिक) व आचार्य अत्रे यांच्या कन्या –  सौ. शिरीष पै (प्रसिद्ध लेखिका) व सौ. मीना देशपांडे.

कै. शांता जोग (शांता खरे)- प्रसिद्ध रंगभूमी अभिनेत्री (हिमालयाची सावली गाजलेले नाटक)

माननीय पुष्पाताई हिरे, माजी मंत्री

प्रसिद्ध गायिका मालती पांडे

डॉक्टर :- शोभा नेर्लेकर, विनया सुळे, गौरी चिटणीस, रत्ना पाटणकर, सुवर्णा बुरुड, कानिटकर

वकिल :- विभावरी शिंदेकर, नर्मदा जोशी, सिंधु औरंगाबादकर.

प्राध्यापिका :-  रत्ना हडप, आशा कुलकर्णी, (पुष्पा खरवंडीकर) रारावीकर, कर्डिले.

नृत्य:- रोशन बेदरकर

आर्किटक्ट :- हेमलता काळे, ओक
बोडस भगिनी - कुमुद, सुधा, मंदा,
लता पंडित, कुसूम सुगंधी
उषा व उत्तरा आठवले,
दांडेकर भगिनी – दुर्गा, शोभा
आपटे भगिनी- छाया, सुधा, चित्रा
स्नेहलता ओक, सुमन पुरोहित, उषा भालेराव
सुधा, शशी, सिंधु, जामखेडकर
आशा, मेधा खत्री
सुमती पाटील, साधना जोशी
सुनंदा,अनघा वाघ;
शांता, लता हिरे
निशा मोने, माधवी आठवले, प्रतिभा धोपावकर
माणिक करमरकर, सुलक्षणा ओक
नीला वैद्य, एकबोटे, नलिनी दाणी
हिरा, विजया कुलकर्णी;

अशा अनेक कितीतरी जणी जगाच्या पाठीवर आहेत.  त्यांच्याशी ह्या ब्लॉगद्वारे संपर्क झाला तर नाशिकच्या स्त्री शिक्षणक्षेत्राची गंगोत्री असलेल्या ग. ग. हायस्कूलचा इतिहास तयार होऊ शकतो.
वरील यादीमध्ये १९७० सालानंतरच्या आंतरजाल साक्षर पिढीला समाविष्ठ केलेले नाही.  १९७०सालच्या आधीच्या  विद्यार्थिनींमधील काही अपवादात्मक जणी आंतरजालावर सक्रीय आहेत. परंतु जी पिढी ह्या माध्यमापासून कैक योजने दूर आहे त्यांच्या कडून व आंतरजाल प्रणित पिढीच्या सहयोगातून तयार होणारा प्रकल्प भावी शिक्षणक्षेत्रास मार्गदर्शक ठरावा.

                     हल्लीच्या शिक्षणात काही अर्थ नाही ‘जुने ते सोने’ असे नुसते म्हणत बसण्यापेक्षा; आपल्याकडच्या आठवणी, फोटो, कविता, चित्रांकित अभिव्यक्ती ह्या द्वारे व्यक्त होण्याचा हा एक ग ग चा एकत्रित प्रयत्न.
नाशिकमध्ये ग. ग.च्या मुली म्हणून प्रसिद्ध असलेल्या विद्यार्थिनींनी  आंतरजालावर एकत्र यावे हाच ह्या प्रकल्पाचा उद्देश्य.
आपल्याला ज्ञात  असलेली नावे तसेच माहिती comment मध्ये लिहिल्यास शालेय जीवनातील मैत्रिणी एकत्र येऊ शकतील.
ग. ग. च्या विद्यार्थिनींचा G.G.Girls – Admin (Madhuri Gayawal – Sumant)हा closed group फेसबुकवर कार्यरत आहे. ह्या ग्रुपमध्ये ग. ग. विद्यार्थिनींचे  सहर्ष स्वागत.
संदर्भ :- ‘पाऊल खुणा’ हीरक महोत्सव स्मरणिका – ग. ग. हायस्कूल, नाशिक

॥ जय गुरुदेवदत्त॥

Monday, August 15, 2016

स्वातंत्र्याची सत्तरी गाठताना

                         आज दि. १५ ऑगस्ट २०१६, भारताचा ७०वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनी शुभेच्छा देताना आठवण होते, ती शाळेतील स्वातंत्र्य दिनाची.
                 ग. ग. हायस्कूल (नाशिक) ची दगडी इमारत जशी स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांची साक्षीदार आहे, तसेच तिने पारतंत्र्याचा काळही अनुभविलेला आहे.
नाशिकमधील मौखिक इतिहासानुसार, पहिल्या महायुद्धाच्या काळात इंग्रज सरकारनी इंग्लंडमधील मुलांसाठी निवासीशाळा नाशिकला बांधली. त्याकाळी असलेले नाशिकचे थंड वातावरण इंग्रजांना मानविणारे होते. इंग्रज मुलांना नाशिक येथे हलवून त्यांच्या शिक्षणाची रहाण्याची सोय व्हावी, म्हणून ही इमारत बांधली गेली.
                           सध्या वास्तुशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेली इमारत १९१४ साली माळरानावर उभारण्यास प्रारंभ झाला.  भव्य इमारतीला लागणारा भक्कम पाया माळरानाच्या जमिनीत टिकतो का? ह्याचा इंग्रज सरकारने १ वर्षभर अभ्यास केला. जमिनीचा पक्केपणा अनुभवास आल्यानंतर, दगडी बांधकामास सुरवात झाली. शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या कामामुळे, इमारत बांधकाम पूर्ण होण्यास २ ते ३ वर्षे लागली. इमारत बांधून पूर्ण झाल्यावर १ वर्षाहून अधिक काळ  क्रीडांगणासकट इमारत इंग्रज सरकारच्या ताब्यात होती. हे क्रीडांगण गावातील मुलांच्या शाळेने इसवी सन १९०६मध्ये खेळण्याची सोय करण्याकरिता, श्रीमंत राजेबहाद्दरांच्या मालकीच्या हत्तीखाना रस्त्यालगत (सध्याचा महात्मा गांधी रस्ता- M.G.Road) दक्षिणेकडे पसरलेल्या उघड्या मैदानावरील काही जागा प्रतिमासिक ५रुपये भाड्याने घेतलेली होती.
                           आपला देश पारतंत्र्यात असल्याने, क्रीडांगण मुलांच्या शाळेला उपलब्ध न होता इंग्रज लष्कराच्या ताब्यात होते.
                                दि. २८ जुलै १९१४ रोजी सुरु झालेले महायुद्ध
दि. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी समाप्त झाले. इंग्रज मुलांना नाशिकला सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न उरला नाही. एप्रिल १९१९ सुमारास, इंग्रज सरकारने ब्रिटिश मुलांसाठी बांधलेल्या शाळेची इमारत, नाशिकमध्ये लोकसहभागातून चालू असलेल्या मुलांच्या शाळेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला.
                         शाळेला लागून असलेला, श्रीमान राजेबहाद्दरांच्या शेताचा तुकडा ३२०० रुपयांना मुलांच्या शाळेने खरेदी केला. शाळेचे हेडमास्तर श्री. रा. का. भिडे व तत्कालिन गेम्स सेक्रेटरी फडके मास्तर यांनी मैदानातील साबरीचे कुंपण, खड्डे, असंख्य वारुळे इत्यादि नष्ट केले.
                          दि. १ जुलै १९१९ रोजी लष्कराच्या ताब्यात असलेली भव्य पटांगणासकट असलेली वास्तू ‘नासिक हायस्कूल’ ह्या मुलांच्या शाळेच्या चालकांच्या ताब्यात इंग्रज सरकारने दिली.
                             इंग्रज मुलांच्या शाळेसाठी बांधलेल्या वास्तूचा सरकारी कार्यालये, लष्कर किंवा व्यापारी तत्त्वावर उपयोग न करता, देशी मुलांच्या शिक्षणासाठी केलेला उपयोग, इंग्रज साहेबाचा सुसंस्कृतपणा दाखवितो.
                        इंग्रज सरकारने बांधलेल्या ह्या इमारतीत  वर्गांच्या प्रशस्त खोल्या, सुसज्ज ड्रॉइंग हॉल व शास्त्र प्रयोगशाळा, लायब्ररीकरिता लागणारा प्रशस्त दिवाणखाना, वरच्या मजल्यावर मध्यभागी असलेले विस्तृत सभागृह (Cetral Hall ) होते.  नासिक हायस्कूल ही मुलांची शाळा स्थलांतरीत झाली. मुलांची संख्या ४७० होती.
                          मोठ्या उत्साहात मुलांची शाळा सुरु झाल्यानंतर दि.१६ जुलै १९१९ रोजी शाळाखात्याचे मुख्य मेहेरबान जे. जी. कॉव्हर्न्टन् यांच्या हस्ते इमारतीचे औपचारिक अनावरण मोठ्या थाटात झाले. ह्या समारंभाला काही  युरोपियन अधिकारी व इतर सद् गृहस्थ हजर होते.
                           शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रामचंद्र काशिनाथ भिडे होते. उद् घाटनानंतर १० दिवसांनी दि. २७ जुलै १९१९ रोजी शाळेचे संमेलन, अॅडव्होकेट कै. पी. व्ही. साठ्ये यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झाले.
                             इसवी सन १९३९ साली, दुसऱ्या महायुद्धाची नांदी होईपर्यंत, मुलांचे ‘नासिक हायस्कूल’ ह्या वास्तूत बहरत होते.

      १९३९ साली परकिय इंग्रज सरकारने ह्या इमारतीतील मुलांचे ‘नासिक हायस्कूल’ हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारी धोरणाला अनुसरुन १९४०च्या जून महिन्यापासून मुलांची शाळा बंद होऊन शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर मुलींच्या प्राथमिक ट्रेनिंग कॉलेजचे दोन वर्ग भरु लागले. आदल्या वर्षी १९३९ जून मध्ये मुलींच्या ए. व्ही. स्कूलचे दोन वर्ग (६वी व ७वी इयत्ता) राजेबहाद्दर वाड्यातून ह्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आलेली होती. १९४० साली उरलेली संपूर्ण मुलींची ए. व्ही. स्कूल स्थलांतर करुन मुलींच्या शाळेचे गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल नामकरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुधाताई अत्रे (कै. आचार्य अत्रे यांच्या पत्नी व आदरणीय शिरीष  पै यांच्या मातोश्री) होत्या. आदरणीय शिरीष  पै ह्या आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
                         १९४५ साली दुसरे महायुद्ध संपले. इंग्रज साम्राजाच्या अस्त झाला. दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन ग ग हायस्कूलने मोठ्या उत्साहात साजरा केला.
                            आमच्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ विद्याताई केळकर (आमच्या लाडक्या मोठ्या केळकर बाई) ह्या ग. ग. हायस्कूलच्या १५ ऑगस्ट १९४७ सालातील हुशार माजी विद्यार्थिनी कु. कुसुम खरे होत.
केळकरबाईंनी शाळेच्या ‘पाऊलखुणा’ ह्या रजत महोत्सवी अंकात माझी शाळा ह्या लेखाद्वारे शाळेच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण जपून ठेवली आहे.
ह्या लेखात सौ. केळकर बाई लिहितात :-


‘१५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आम्ही आम्रवृक्षारोपण केले होते. तो आम्रवृक्ष बहरत असताना आम्हाला अतीव आनंद होई. मी शिक्षिका झाल्यानंतर दुर्दैवाने तो आम्रवृक्ष उन्मळून पडला.’
                                  पहिला स्वातंत्र्य दिन वृक्षारोपण करुन साजरा करणाऱ्या
ग. ग.शाळेला ७०व्या स्वातंत्र्यदिनी सलाम.

संदर्भ :-
‘पाऊल खुणा’ हीरक महोत्सव स्मरणिका – ग. ग. हायस्कूल, नाशिक
विराम -  नासिक हायस्कूल स्मृतिग्रंथ

Sunday, August 7, 2016

जागतिक मैत्री दिन ( दि. ७ ऑगस्ट २०१६) शुभेच्छा



 विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासास प्राधान्य देणारी २० व्या शतकातील शाळा 
                                       ग. ग. हायस्कूल नाशिक
संकलित व्हिडिओ :-        https://youtu.be/e_IBF9WgHVw

Tuesday, August 2, 2016

साप्ताहिक प्रार्थना वेळापत्रक


वार
प्रार्थना
आंतरजाल संदर्भ
सोमवार
ए मालिक तेरे बंदे हम
https://www.youtube.com/watch?v=JYkEPSb4uIU
मंगळवार
हम को मन की शक्ति देना
https://www.youtube.com/watch?v=eT1c-uDgb9w
बुधवार
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Om_Namoji_Aadya
गुरुवार
तुमही हो माता, पिता तुमही हो।
https://www.youtube.com/watch?v=S3XkwMDhCHU
शुक्रवार
या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता।
https://www.youtube.com/watch?v=PvEzwETM3sE&feature=youtu.be
शनिवार
भजन,
भारतीय संस्कृती :सानेगुरुजी (एक परिच्छेद वाचन)


                                संकलन - सौ माधुरी गयावल (कु. माधुरी सुमंत) 
                                                            माजी विद्यार्थिनी
ग. ग. हायस्कूलचा अभिमान :-
सौ. माधुरी गयावल (माधुरी सुमंत) ह्या प्रतितयश Pathologist असून कवयित्री व चित्रकार आहेत. त्यांचा  मनांगण काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे.
 अलका विभास (अलका सालकाडे) ह्या आमच्या ग. ग. हायस्कूल शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्यांनी ह्या  http://aathavanitli-gani.com/ वेब साईटद्वारे समस्त मराठी गाण्यांचे संकलन करुन मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

गुरुपौर्णिमा दि. १९ जुलै २०१६

                   ग. ग. हायस्कूल चा एक अविभाज्य भाग म्हणजे आपल्या पलुस्कर बाई आणि त्याचं व्हायोलिन !!तन्मयतेनं व्हायोलिन वाजवतानाची बाईंची छबी कायम लक्षात आहे. 
                   आज अनेक वर्षांनंतर म्हणजे जवळ जवळ ४ तपांनंतर बाईंशी संपर्क झाला आणि त्या दिवसांची आठवण ताजी करताना वाटलं की हिरवा स्कर्ट, पांढरं ब्लाउज घातलेली मी शाळेच्या सेन्ट्रल हॉल मध्ये बसलेले आहे आणि सगळ्या वाद्यांच्या साथीने नेहमीप्रमाणे प्रार्थना म्हणते आहे. 
                        बाईंना मी म्हटलं शाळेबद्दल काय आठवतं तुम्हाला? त्यांनी एकच शब्द सांगितला 'अप्रतिम!'  मग म्हणाल्या खूप सुंदर दिवस होते ते!. 
                       त्यांचा जन्म ८ जुलै १९३७ चा. माहेरच्या मंदाकिनी वाघ. त्यांचे काका गाण्याचे क्लासेस घेत असत. तिथेच गाणं कानावर पडे. त्याच शिदोरीवर त्यांनी गाण्याच्या विशारदपर्यंत परीक्षा दिल्या. तशा त्या मूळ पुण्याच्याच.पुण्यात भारत गायन समाजाच्या स्पर्धा असायच्या. त्यात सतत ३ वर्ष पाहिले बक्षीस मिळाले.
गम्मत म्हणजे या स्पर्धांमध्ये फक्त ३ वेळा भाग घेता यायचा. श्री. केतकर यांनी त्यांना व्हायोलिन बक्षीस दिलं. ते व्हायोलिन १९२२ साली तयार केलेलं होतं.  वादनाचं रूढ अर्थाने कुठलही शिक्षण मिळालेलं नाही पण मैफलीत बघून, ऐकून त्यांनी त्यात प्राविण्य मिळवलं.
            लग्न होऊन १९६४ साली नाशिकमध्ये आल्यावर त्यांची  १९६७ साली आपल्या शाळेत राजदेरकर बाईंच्या काळात त्यांची कारकीर्द सुरू झाली. आधी साधारण २ वर्ष अर्ध वेळ आणि मग पूर्ण वेळ.
                  त्या म्हणतात " राजदेरकर बाईंनी मला अक्षरश: घडवलं 
शाळेत सर्व प्रकारची वाद्ये होती. राजदेरकर बाईंच्या आग्रहाने ती हाताळायला मिळाली आणि गायन, वादन दोन्हीवर हुकमत मिळवली. शाळेच्या काम व्यतिरिक्त मैफलीत साथ करणे.भजनी मंडळात सहभाग घेणे. नाशिकमधल्या प्रसिद्ध नृत्यांगना सौ. रेखा नाडगौडा यांच्या नुत्यवर्गासाठी साथ देणे हे पण सगळे केलं. घरात गाण्याचं वातावरण नसूनही गाण्यासाठी व नोकरीसाठी पूर्ण सहकार्य मिळालं   पण आता वय ८० च्या घरात आहे. हात थरथरतो!"
                      त्यांच्या दोन्ही मुली राधिका आणि पद्मावती ( १९८३-१९८४ च्या पास आऊट ) आपल्याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. 
राधिका म्हणते " आपल्या शाळेत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी समारंभपूर्वक साजरे होत.
त्या कार्यक्रमांसाठी आई प्रचंड मेहनत घेत असे. कुठलाही  समूहगीत असो, भजन असो,  ते उत्तमपणेच सादर झालं पाहिजे म्हणून जीवाचं रान करत असे. शाळेचा तो प्रतिज्ञा- प्रार्थना वगैरे माहोल खरंच खूप छान होता. साधारण १ हजार विद्यार्थिनीसाठी झटणाऱ्या बाई बघत मोठ्या झालो.  त्यामुळे आईला मुली म्हणून पूर्ण सहकार्य केलं. त्याबद्दल तक्रार नाही"
      अशा या आपल्या पलुस्कर बाईंना गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन असो !!!
सौ. माधुरी गयावल (माधुरी सुमंत)
माजी विद्यार्थिनी ग. ग.  हायस्कूल
                इसवी सन १९७५ नंतर आलेल्या मुख्याध्यापिकांनी प्रार्थनेची परंपरा तशीच जतन करुन प्रार्थनेचे केलेले वेळापत्रक आमच्या शाळेतील माजी विद्यार्थिनी सौ. माधुरी गयावल (माधुरी सुमंत)  ह्यांनी गुरुपौर्णिमा  (दि. १९ जुलै २०१६)निमित्त प्रसिद्ध केले.




ग. ग. हायस्कूलची शान : सामुहिक प्रार्थना


                     विद्येचे मंदिर असलेल्या शाळेची सुरवात  प्रार्थनेने होत असते.  
 इसवी सन १९७०च्या सुमारास ग. ग. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका (मोठ्या बाई) सौ. आशाताई राजदेरकर बाई होत्या.  १९७१ साली बांगला देशातील  युद्ध भारताने जिंकले. स्वतंत्र भारताची रजत जयंती (स्वातंत्र्याचा २५वा वाढदिवस - इसवी सन १९७२)  महोत्सवाने भारावलेले वातावरण होते.
ह्या काळात महाराष्ट्राचे लाडके संगितकार श्री. वसंत देसाई व त्यांचे नाशिक मधील सहकारी श्री. बाळ देशपांडे सर व आमच्या शाळेच्या श्रीमती प्रफुल्लता त्रिवेदी बाई (सौ. प्रफुल्लता खटी) तसेच आमच्या मोठ्याबाई ही सर्व मंडळी  स्वातंत्र्याची रजत जयंती धुमधडाक्यात साजरी व्हावी, ह्या साठी प्रयत्नशील
होती.  इतर सर्व शाळांमधील गुरुजनांचे, आम्हा विद्यार्थ्यांकडून पोलिस परेड
ग्राऊंडवर व्यवस्थित सादरीकरण व्हावे, ह्या साठी जीवापाड परिश्रम चालले आम्ही अनुभवलेले आहेत.
                    ह्या सर्व घटनाक्रमामधून घडत गेला, ग. ग. च्या प्रार्थनेचा प्रकल्प. ग. ग. च्या सेंट्रल हॉलमध्ये सुमारे १००० विद्यार्थिनी शिस्तीत रांगेने एकत्र जमायच्या. आमच्या शाळेतील श्री. गवळीसर, श्रीमती प्रफुल्लता त्रिवेदी बाई, श्रीमती बलवंती दीक्षित बाई, सौ. पलुस्करबाई  ह्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची प्रार्थना सादर केली जात असे.
               प्रथम मुलींनी वाजविलेल्या बॅंडवर राष्ट्रगीत नंतर शाळेच्या पंतप्रधान विद्यार्थिनीस अनुसरुन सामुहिक प्रतिज्ञा.
               श्रीमद् भगवद् गीतेतील १५वा अध्याय किंवा एखादी प्रार्थना विद्यार्थिनी संचलित वाद्य वृंदाच्या ताल सुरात सर्व शाळा म्हणत असे.
                   विद्यार्थिनी तसेच शिक्षकांचे वाढदिवस - शाळेच्या बागेतील सोनचाफ्याचे फुल प्रदान करुन शुभेच्छा.
                  रोजच्या बातम्या, दैनंदिन घडामोडी, दिनविशेष इत्यादी बाबी लहान वर्गापासून मोठ्या वर्गातील विद्यार्थिनी सांगत असत.
                   मुख्याध्यापिका किंवा पर्यवेक्षिका विद्यार्थिनींशी संवाद साधत असत.
{उदा. बांगला देश युद्धाच्या वेळी मोठा नकाशा स्टेजवर लावून मोठ्याबाई
(सौ. राजदेरकरबाई) युद्धाची दैनदिन माहिती सांगत असत.}

                  इसवी सन १९७५साली आदरणीय सौ. राजदेरकर बाई सेवानिवृत झाल्या.

Tuesday, June 28, 2016

शाळेच्या आठवणी जागवणा-या ह्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत

 G.G.H.S.Nashik Blog उद्देश्य :-
                                आमची ग. ग. हायस्कूल नाशिक, ही शाळा श्रीमद् भगवद् गीतेतील अध्याय १५, पेटीच्या सुरांत सामुहिक गायनाने सुरु होत असे. श्रीमद भगवद् गीतेतील अध्याय १५ मधील पहिल्या श्लोकांत विश्वाचे वर्णन करताना, गवान श्रीकृष्ण म्हणतात,
              श्री भगवान उवाच।
र्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वथम् प्राहुः अव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यः तम् वेद सः वेदवित्॥ १५ – १ ॥
{ अर्थ :-
श्री गवान म्हणाले, “सर्व छंद ही ज्याची पाने आहेत. त्या अश्वथ (पिंपळ) वृक्षाचे मूळ वर आहे आणि खाली शाखा पसरलेल्या आहेत. त्याला अविनाशी म्हणतात. जो हे जाणतो, त्यालाच वेदांचा जाणकार असे म्हणतात.”}

                         ‘ग. ग. हायस्कूल, नाशिक’ ह्या आमच्या शालेय जीवनातील वृक्षाचे रोपण ‘ए. व्ही. (Anglo- Vernacular) स्कूल’ - मुलींच्या शाळेच्या रुपांत फेब्रुवारी १९२१  साली साठ्ये वाड्यात झाले. ह्या रोपाची जोपासना करण्यासाठी हुजुरपागा, पुणे येथील अनुभवी शिक्षिका व मुख्याध्यापिका यांची बदली नाशिकला होत असे. आदरणीय पुतळाबाई पवार ह्या पहिल्या मुख्याध्यापिकेने, हे छोटेसे रोपटे नाशिकच्या तीर्थक्षेत्री लावले. अशाप्रकारे ग.  ग. हायस्कूलचे मुख्य मूळ हुजुरपागा, पुणे ही शाळा आहे.

                          काळाच्या ओघांत ह्या रोपट्याचे १९४०साली प्रशस्त दगडी इमारतीत स्थलांतर झाले. सन १९४० साली मुलींच्या  शाळेने ‘गव्हर्न्मेंट गर्ल्स हायस्कूल’ नाव धारण केले.
                         ग. ग. हायस्कूल, नाशिक शाळेच्या प्रशस्त दगडी इमारतीचे अनावरण दि. १६ जुलै  १९१९ रोजी त्या वेळेचे शाळाखात्याचे मुख्य मेहेरबान जे. जी. कॉव्हर्न्टन् यांच्या हस्ते मोठ्या  थाटात झाले. ह्या समारंभाला आणखीही काही युरोपियन अधिकारी आणि इतर सद् गृहस्थ उपस्थित होते.
                          नजिकच्या भविष्यकाळात, अजुन ३ वर्षांनी दि. १६ जुलै २०१९ रोजी ह्या वास्तूच्या शैक्षणिक योगदानाची शंभर वर्ष पूर्ण होतील.   
                         ग. ग. हायस्कूल - वास्तुपुरुषाच्या आशीर्वादाने तसेच सर्व गुरुजनांच्या अथक प्रयत्नांतून हा शैक्षणिक वृक्ष विस्तारत गेला. ह्या वृक्षाच्या छायेत शिकलेल्या अनेक विद्यार्थिनी जगभर ‘ग. ग.च्या मुली’ असा आपला ठसा उमटविताना दिसतात.

                                              G.G.H.S.Nashik ह्या ब्लॉगद्वारे लौकिक अर्थाने असलेल्या  हुजुरपागा (पुणे) शाळेच्या नाती व ग. ग. हायस्कूल (नाशिक)च्या आम्ही मुली(विद्यार्थिनी), एकत्रितपणे आमच्या (G.G.H.S.,Nashik) शाळेचा इतिहास, आमच्या  भूतकाळातील शालेय आठवणी, आमचे शिक्षक, आमच्या   शाळेतील विविध उपक्रम तसेच वर्तमानकाळातील आमचे वैयक्तिक यश यांचे संकलन आपल्या सर्वांच्या सहकार्याने करीत आहोत.
॥जय श्रीगुरुदेव दत्त॥